गरीब विद्यार्थ्याचा भीषण अपघात : दात्यांना मदतीने आवाहन !

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील आकाशवाणी चौकात वाळू वाहतूक करणार्‍या डंपरने उडविलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसर्‍या वर्षाचा विद्यार्थी तरूणाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. सर्वसाधारण परिस्थिती असणार्‍या या विद्यार्थ्याला दात्यांनी मदत करावी असे आवाहन त्याचे आप्त आणि मित्रमंडळीने केले आहे.

परभणी येथील रहिवासी व शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा तिसर्‍या वर्षाचा विद्यार्थी विजय नारायण पुरी (वय २२ वर्ष ) याला २५ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता आपल्या रूम पार्टनरला रेल्वे स्टेशनवर सोडायला जात असतांना आकाशवाणी चौकात डंपरने उडविले. या अपघातात विजय पुरी हे गंभीर जखमी झालेत. त्यांना एका रिक्षाचालकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्याच्या मित्रांनी खासगी हॉस्पिटल सहयोग क्रिटिकल केअर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

विजय पुरी हा हलाखीच्या परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. तो शिक्षण घेत असतांना खासजी क्लासमध्ये शिकविण्याचे काम करत आहे. त्याचे वडील हे परभणी येथे लहाने हॉटेल चालवितात. त्याला दोन भाऊ आहेत. मोठा भाऊ योगेश हा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात तर लहान भाऊ ऋषिकेश हा नांदेड येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबांत अनुवांशिक असा हिमोफिलिया हा आजार आहे. त्याच्या वडिलांना व दोघा भावांना हा आजार आहे. विजय यास हा आजार नाही. मात्र अपघातामुळे आता त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, काल रात्री रोटरीचे अध्यक्ष उमंग मेहता व शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ. मिलिंद निकुंभ  यांनी हॉस्पिटलला भेट देवून विजय याच्या प्रकृतीची विचारपूस केली. विजय याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दात्यांनी यात वैंयक्तीक आणि सामाजिक संस्थांच्या पातळीवर विजय पुरी यांना मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन विजय यांचा जळगाव येथील मित्र परिवार आणि त्याच्या कुटुंबियांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी कुणीही राजेंद्र शेषराव जोगदंड यांच्याशी ८४३२०३०४०४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Protected Content