पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ पुन्हा सेवेत रूजू

जळगाव प्रतिनिधी | लॉकडाऊनमधील मद्यतस्करीत कथितरित्या संबंधीतांना मदत केल्याच्या कथित आरोपातून बडतर्फे करण्यात आलेले एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तत्कालीन निरिक्षक रणजीत शिरसाठ यांना शासनाने पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने ते जिल्हा पोलीस दलात पुन्हा एकदा रूजू झाले आहेत.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर जिल्ह्यात मद्यतस्करी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. यातच जळगावमधील आर.के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल २०२० रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुकानात छापा टाकून मद्यविक्रीचा डाव हाणून पाडला होता. याप्रकरणी प्राथमिक तपासात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर यात गुन्ह्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले होते. यात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस नाईक जीवन पाटील, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे नाईक संजय जाधव, मुख्यालयातील पोलिस नाईक मनोज सुरवाडे व तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ भारत पाटील यांचा देखील बेकायदेशीर दारूविक्रीत सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्याची चौकशी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ आणि चारही पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी रणजित शिरसाठ यांची पोलीस अधिक्षकांनी उचलबांगडी करत पोलीस मुख्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे या तीन पोलिसांना बडतर्फ करण्यात आले होते. तर पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचाही बडतर्फचा प्रस्ताव महासंचालकांकडे पाठविण्यात आला होता.

या निर्णयाच्या विरोधात रणजीत शिरसाठ, जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे यांनी शासनाकडे अपील दाखल केले होते. यात ६ ऑगस्ट २०२१ रोजी गृह विभागाने बडतर्फीचे आदेश रद्द केले. १० सप्टेंबर रोजी यातील जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे हे सेवेत रूजू झाले. तर २७ सप्टेंबर २०२१ रोजी पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ हे पोलीस सेवेत पुन्हा रूजू झाले आहेत. ते पोलीस मुख्यालयात रूजू झाले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!