एसटीच्या कार्यप्रणालीस लोकाभिमुख करावे ! : भगवान जगनोर

जळगाव प्रतिनिधी | ”रस्ता तिथे एसटी-सोबत प्रवासी तिथं एसटी’ अशी म्हण कार्यरत करून एसटी महामंडळाच्या कार्यप्रणालीस अजून लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी केले. ते प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, जळगाव विभागातील खातेनिहाय वाहतूक नियंत्रक पदाची परीक्षा देणार्‍या उमेदवारांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विभागीय वाहतूक अधीक्षक डी जी बंजारा यांच्यासह विभागीय अधिकारी सुरेश महाजन, महेंद्र शिंदे, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.

वाहतूक नियंत्रक पदाच्या पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या १९८ कर्मचार्‍यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मध्यवर्ती कार्यशाळेतील ज्ञानवर्धिनी सभागृहात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी वाहतूक नियंत्रक पदावर कार्य करीत असताना प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी काय काय योजना आखता येतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबत वाहतूक नियंत्रक पदाची कार्यप्रणाली अतिशय सोप्या भाषेत कर्मचार्‍यांना समजावून सांगण्यात आली.

याप्रसंगी उद्घाटनपर भाषण करताना विभाग नियंत्रक जगनोर यांनी सांगितले की सद्यस्थितीत काळ बदललेला आहे त्यामुळे येणार्‍या काळात एसटी महामंडळाची पुनश्च आर्थिक उभारणी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहेत. प्रवाशांची वाट न पाहता आपणच प्रवाशांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ‘रस्ता तिथे एसटी सोबत प्रवासी तिथं एसटी’ अशी म्हण कार्यरत करून एसटी महामंडळाच्या कार्यप्रणालीस अजून लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. भारतात अनेक मंदिरांवर सोन्याचा पत्रा जडविला आहे तसाच पत्रा एखाद्या लाल परी साठी तयार करता आला तर तो जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण ठरेल, असे भावनिक उदगार त्यांनी या प्रसंगी काढले.

Protected Content