इंधन तुटवड्याच्या भितीपोटी रात्रभर पेट्रोल पंपावर तोबा गर्दी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातील वाहन चालक आणि मालक संघटनांनी चक्का जामची हाक दिल्याने इंधन तुटवडा होण्याच्या भितीपोटी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर काल सायंकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत तोबा गर्दी उसळली आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच तीन फौजदारी कायदे नव्याने तयार केले आहेत. यात मोटार वाहन कायद्यातील हिट अँड रन या प्रकारातील गुन्ह्यासाठी कठोर तरतूद करण्यात आली आहे. यासाठी सात वर्षांचा कारवास आणि दहा लाख रूपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. आधीपेक्षा हा कायदा खूप कठोर करण्यात आला आहे. यामुळे याला आता विरोध होऊ लागला आहे.

नवीन कायद्यांना विरोध करण्यासाठी १ जानेवारी पासून देशभरातील वाहन चालक आणि मालकांनी आंदोलन सुरू केले आहे. हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी या आंदोलनाची तीव्रता दिसून आली असून अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, यामुळे पेट्रोल व डिझेल वाहून नेणार्‍या टँकर्सलाही फटका बसला आहे. अनेक टँकर्स चालक बंदमध्ये सहभागी झाले असून रस्त्यांवर असणार्‍या टँकर्सला ठिकठिकाणी थांबविण्यात आले आहे. यामुळे एक-दोन दिवसात पेट्रोल व डिझेलची टंचाई होण्याची शक्यता आहे. नेमक्या याच कारणामुळे काल सायंकाळपासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपासमोर दुचाकी आणि चारचाकी तसेच अवजड वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले आहे. रात्री उशीरापर्यंत जळगावातील पेट्रोल पंपवर गर्दी होती. तसेच हायवेवर तर रात्रभर गर्दी दिसून आली आहे.

साकेगाव जवळच्या महामार्गावरील सातही पेट्रोल पंपावर रात्री उशीरापर्यंत मोठी गर्दी दिसून आली आहे. तर, आज पहाटे पासूनच पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर गर्दी झालेली आहे.

Protected Content