जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस हा अजून चार-पाच दिवसांपर्यंत कायम राहणार असल्याचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. काल रविवारी राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. तर आज सकाळपासून देखील अनेक भागात वृष्टी होतच असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने अजून काही दिवसांपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती दिली आहे.
हवामान खात्याने राज्यातील कोकण किनारपट्टीसह कोल्हापूर, पुणे, सातारा आदी भागांना ऑरेंज अलर्ट दिला असून राज्यातील अन्य जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. जळगाव जिल्हा देखील यलो अलर्टच्या अखत्यारीत येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार जलधारा कोसळण्याची शक्यता आहे. येत्या किमान चार ते पाच दिवसांपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे.