गिरणामाई भागवणार पाळधीवासियांची तहान !

जळगाव प्रतिनिधी– धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रूक या दोन्ही मोठ्या गावांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळत जलजीवन मिशनच्या अंतर्गत गिरणेवरून पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २१ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. अलीकडेच वाघ नगरातील जनतेला पाणी पुरवठा केल्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या स्वत:च्या गावातील जनतेची पाण्याची समस्या कायम स्वरूपी संपुष्टात येणार असल्याने गिरणामाई पाळधीकरांची तहान भागविणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक ही दोन्ही मोठी गावे असून त्यांची एकत्रीत लोकसंख्या ही सुमारे ४० हजार आहे. ना. गुलाबराव पाटील हे स्वत: येथील रहिवासी असून त्यांनी गावासाठी आजवर विविध विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी पाळधीकरांसाठी नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे आश्‍वासन दिले होते. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या आश्‍वासनाची पूर्तता करण्यात आली आहे.

या अनुषंगाने पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द नळ पाणीपुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहित निकषांपेक्षा जास्त असल्यामुळे सदर नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक यांनी शासनाकडे तांत्रिक मान्यता देऊन सादर केला होता. जल जीवन मिशन चे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या तांत्रिक छाननी समितीची बैठक ७ एप्रिल रोजी घेण्यात आली होती त्यात अंदाजपत्रकात पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द येथील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रुपये ४१२५ इतका दरडोई खर्च असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या २० कोटी ९० लक्ष ६५ हजार इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेच्या अंतर्गत गिरणा नदीतून पाण्याची उचल करून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील एका टेकडीवर उभारण्यात आलेल्या जलकुंभात टाकण्यात येणार आहे. येथून हे पाणी पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या दोन्ही गावांमधील ग्रामस्थांना जलवाहिन्यांच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. दोन्ही गावांची भविष्यातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनीची आखणी करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) कालच जाहीर करण्यात आलेला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे जलजीवन मिशनच्या अंतर्गत कार्यान्वित करण्यात येणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे. अर्थात, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाला पाणी पुरवठा करण्याच्या दिशेने आपल्या गावातूनच सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी अलीकडेच जळगाव शहराचा विस्तारीत भाग असणार्‍या वाघनगरसह परिसरातील नागरिकांसाठी थेट वाघूर धरणावरून पाणी आणून त्यांनी तहान भागविली आहे. या पाठोपाठ आपल्या स्वत:च्या गावातील नागरिकांची पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर करण्याच्या आश्‍वासनाची पूर्तता पालकमंत्र्यांनी केली आहे.

Protected Content