एटीएममध्ये बनावट पासवर्डचा वापर करून पावणेदोन कोटींचा अपहार

Jalgaon News जळगाव प्रतिनिधी । एटीएममध्ये छेडछाड करून तसेच बनावट पासवर्डचा वापर करून तब्बल १ कोटी ८० लाख रूपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

आयडीबीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया या चार बँकांनी एटीएममध्ये रकमेचा भरणा करण्यासाठी इलेक्ट्रिकल पेमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. मुंबई या कंपनीची नेमणूक केली आहे. या कंपनीने एटीएममध्ये रकमेचा भरणा करण्यासाठी आर.सी.आय. कॅश मॅनेजमेंट कंपनी मुंबईची नेमणूक केली होती. या कंपनीत महेश शंकरराव सानप व रोशन बाळासाहेब अहेर हे दोघे नोकरीला लागले होते.

या दोन्ही कर्मचार्‍यांनी विविध बँकांच्या एटीएममध्ये छेडछाड व बनावट पासवर्डचा वापर करून १ कोटी ८० लाख ९ हजार ५०० रुपयांचा अपहार केला होता. रोशन बाळासाहेब अहेर, (वय २८, रा. न्यायडोंगरी, ता. नंदगाव, जि. नाशिक) व महेश शंकरराव सानप, (वय ४२, रा. शेजवळकरनगर, चाळीसगाव) या दोघांना अटक केली असून ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर यातील मुख्य सूत्रधार आर.सी.आय. कंपनीचा संचालक सुदीप नारायण रमाणी भूषणप्रसाद (रा. ओबेरॉय गार्डन, इस्टेट कांदिवली फार्म रस्ता पवई, मुंबई) हा मात्र फरार झाला आहे.

ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनीस शेख, वाल्मीक वाघ, मसूद शेख, नितीन सपकाळे यांनी केली.

Protected Content