रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

Jalgaon जळगाव प्रतिनिधी । रेल्वेच्या नोकरीच्या आमिषाने चार युवकांची तब्बल ५६ लाख रूपयांमध्ये फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव (dharangaon) तालुक्यातील पिंपळेसीम येथील दीपक गयभू पाटील आणि कांतीलाल पंडित पाटील, संदिप छोटू पाटील व दीपक मच्छींद्र पाटील या चार युवकांनी सन २०१८ मध्ये रेल्वे खात्यात वर्ग ड पदासाठी अर्ज केलेले होते. कांतीलाल पाटील याच्या मामा व मामीच्या ओळखीने अशोक चौधरी, गजानन राठोड , अजय पंजाबराच रामटेके (रा.यवतमाळ) व गणेश बळीराम इंगवले (रा.नागपूर) या चौघांशी भेट झाली. त्यांनी कांतीलालसह चौघांना रेल्वेत नोकरीला लावण्यासाठी प्रत्येकी १४ लाख रुपयांची मागणी केली. प्रारंभी वैद्यकीय तपासणीसाठी ३ लाख रुपये दिले. ३ डिसेंबर २०१८ रोजी लेखी परीक्षेसाठी त्यांना हॉल तिकीट मिळाले. परीक्षा देताना पेपरवर काही लिहू नका, प्रश्‍नांवर टीकमार्क न करता केवळ क्रमांक टाकून येण्यास चौधरीने त्यांना सांगितले. नाशिक येथील इंदिरा कॉम्प्युटरमध्ये त्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. ६ डिसेंबर रोजी कांतीलालने २ लाख रुपये अजय याला देण्यासाठी त्यांना दिले.

पाटणा येथे २९ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता युवक वैद्यकीय तपासणीसाठी पोहोचले. पाटणा रेल्वे स्थानकावर रामटेके आला. रामटेकेने सनीकुमारसिंग याची रेल्वे अधिकारी म्हणून ओळख करुन दिली. त्याने चौघांची वैद्यकीय तपासणी पाटणा येथील पारस हॉस्पिटलमध्ये केली. घरी गेल्यावर नियुक्तीपत्र मिळेल,असे सांगितल्यानंतर युवक जळगावला परतले. यानंतर ६ एप्रिल पासून तीन महिने त्या युवकांना सासाराम जंक्शन रेल्वे स्टेशन बिहारजवळील एका खासगी खोलीत प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण दिल्यानंतर कांतीलाल व संदिप यांना धनबाद झारखंड येथील नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर तीन ते चार दिवसांनी ते युवक परत आले. त्यांना रेल्वेत नोकरीसाठी हजर करुन घेण्यात आले नाही. त्यानंतर फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. त्यांनी राठोड व चौधरी यांच्याकडे पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला. चौधरी याने दिपक याला ७ लाख रुपये परत दिले. उर्वरित पैसे देण्यासाठी ते टाळाटाळ करू लागल्याने या चारही युवकांनी पोलीसात धाव घेतली.

या प्रकरणी दिनेश अशोक चौधरी (रा.वाटिकाश्रम जळगाव, गजानन ऊखा राठोड रा.होळ हवेली ता.जामनेर), अजय पंजाबराव रामटेके (रा.सिद्धेश्‍वर नगर यवतमाळ), सनीकुमार अल्लखनिरंजनसिंग व एक अनोळखी व्यक्तीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content