राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कारांची घोषणा

जळगाव प्रतिनिधी । नोबेल फाउंडेशन आणि श्रम साधना ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी यांच्यातर्फे राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचीत्य साधून विज्ञान क्षेत्रात उत्तम कार्य करणार्‍या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी या ३ गटांत पुरस्कारांची घोषणा शनिवारी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्र-कुलगुरू डॉ.पी. पी. माहुलीकर यांनी केली.

शाळा गटात राज्यस्तरीय नोबेल विज्ञान प्रेरणा पुरस्कार कराड (जि.सातारा) येथील सरस्वती विद्यामंदिराला जाहीर झाला. बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन आणि जळगाव येथील शानबाग विद्यालय यांना राज्यस्तरीय नोबेल विज्ञान प्रेरणा या पुरस्कारासाठी द्वितीय सन्मान जाहीर करण्यात आला.

शिक्षक गटासाठी देण्यात येणारा डॉ. सी.व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार भुसावळच्या के. नारखेडे विद्यालयाचे विज्ञान शिक्षक भानुदास जोगी यांना जाहीर झाला. मालेगाव येथील कै.ल.रा.काबरा विद्यालयाचे महेश बागड आणि सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या शिक्षिका उर्मिला नाचन यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहे.

विद्यार्थी गटात कराड येथील यशवंत विद्यालयाचा विद्यार्थी ओम कुत्ते यास डॉ. एपीजे कलाम बालवैज्ञानिक पुरस्कार देण्यात येत असून जळगाव येथील प्रगती विद्यालयाचा विद्यार्थी कौस्तुभ पवार व पनवेल जिल्ह्यातील वाजे हायस्कुलची विद्यार्थिनी संजीवनी मढवी यांना उत्तेजनार्थ बालवैज्ञानिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Protected Content