सोलर प्रकल्प पीडित शेतकरी करणार मुंबईत आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोलर प्रकल्प पिडीत शेतकर्‍यांनी आता १६ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

तालुक्यातील सोलर प्रकल्प पिडीत शेतकरी गेल्या ४ वर्षापासून कृती समितीच्या माध्यमातून न्यायासाठी शासन दरबारी लढा देत आहेत. तत्कालीन सरकारच्या राजकीय आश्रयाखाली १२०० एकर शेतजमिनी बेकायदेशीर, गैरमार्गाने, कवडीमोल भावात लाटून प्रकल्प थाटला गेला, असा या शेतकर्‍यांचा आरोप आहे. या प्रकल्पाची एसआयटीव्दारे चौकशी करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

एसआयटीमार्फत चौकशीला विलंब होत असल्याने येथील सोलर प्रकल्प पीडित शेतकर्‍यांनी आता आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. जोपर्यंत येथील सोलर प्रकल्पाची एसआयटीमार्फत चौकशीचा ठोस निर्णय होत नाही. तोपर्यंत पीडित शेतकरी व कृती समितीचे कार्यकर्ते आंदोलन थांबवणार नसल्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्यासाठी शेतकरी मुंबई येथील आझाद मैदानावर १६ मार्च पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

Protected Content