आता खटोड बंधू देखील गोत्यात; बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याची तक्रार

जळगाव प्रतिनिधी । श्रीकांत आणि श्रीराम खटोड या ख्यातनाम व्यावसायिकांनी सुभाषचौक अर्बन सहकारी पतपेढीतून बनावट कागदपत्रे दाखवून कर्ज लाटल्याची तक्रार अजय ललवाणी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीकांत खटोड आणि श्रीराम खटोड हे त्यांच्या हाय-लेव्हल पॉलिटीकल कनेक्शन्समुळे वलायाच्या झोतात आहेत. आता त्यांच्यावरच अजय शांतीलाल ललवाणी यांनी आरोप केले आहेत. यात म्हटले आहे की, मेहरूण येथील सर्व्हे क्रमांक ४१३ मधील प्लॉट क्रमांक १५९ व इतरही मिळकती संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सिव्हिल अ‍ॅप्लिकेशन प्रलंबित आहे. तरीही या मिळकतीवर सुभाष चौक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीने बेकायदेशीरपणे २३ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

कर्ज घेतलेल्या मिळकतीचे सन २०२०-२१ साठी बाजारमूल्य ७ हजार ६७० रुपये प्रति चौरस मीटर आहे; परंतु कर्ज याच्या किती तरी पट म्हणजेच ७४ हजार ७१० रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे दिले आहे. कर्ज देताना प्रकरणासोबत दिलेला मूल्यांकन दाखलाही खोटा, चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. या मिळकतीवर १७ कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज श्री डेव्हलपर्स आणि श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.च्या वतीने श्रीराम गोपालदास खटोड यांनी घेतलेले आहे. तर ५ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज श्रीकांत गोपालदास खटोड यांनी घेतलेले आहे.

श्रीकांत खटोड हे सुभाष चौक अर्बनचे अध्यक्षही आहेत. अशा प्रकारे सुभाष चौक अर्बनचे अध्यक्ष खटोड यांनी स्वत:च्या फर्मला बेकायदेशीरपणे बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ कोटी रुपयांचे कर्ज दिलेले असल्याचे ललवाणी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

२३ कोटी रुपयांच्या कर्जाची कसून तपासणी करावी. कर्ज देताना दाखल केलेल्या मूल्यांकन दाखला, सर्च रिपोर्ट तसेच संपूर्ण कागदपत्रांची चौकशी करावी. कर्ज देताना झालेल्या बेकायदेशीर कामाच्या अनुषंगाने संबंधित सर्व अधिकार्‍यांवर तसेच सुभाष अर्बन सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी ललवाणी यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक बिडवई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Protected Content