अभिषेक पाटील यांच्या तक्रारी बाबत १२ रोजी बैठक

0
19


जळगाव प्रतिनिधी । महापालिकेत आरक्षण बदलाचा धाक दाखवून जमीनी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केल्यानंतर याबाबत आता १२ जानेवारी रोजी बैठक बोलावण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, अभिषेक पाटील यांनी शहराच्या विकास योजना आराखड्याच्या माध्यमातून आरक्षण बदलाची भिती दाखवून आर्थिक लुट सुरू असल्याची गंभीर तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. मनपाने सध्या विकास योजना आराखडा योजनेचे काम हाती घेतले असून झेनोलिथ सिस्टिम प्रा. लि. या कंपनी मार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. विकास योजना आरक्षणात ७० टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने व्यपगत केले आहे; परंतु या आराखडा तयार करण्याच्या निमित्ताने माजी स्थायी समिती सभापतींकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केली होती. आरक्षण बदलून टाकण्याचा धमकी देत आर्थिक देवाण-घेवाण सुरू असल्याचेही तक्रारीत म्हटले होते.

अभिषेक पाटील यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून या प्रकरणी १२ जानेवारी रोजी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत आता नेमके काय होणशार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.