सर्व सण साधेपणानेच साजरे करा ! – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी – साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय तृतीया आणि मुस्लीम धर्मियांसाठी सर्वात मोठे पर्व असणार्‍या रमजान ईदनिमित्त पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाचा पूर्ण नायनाट होईपर्यंत सर्व सण साधेपणानेच साजरे करणे योग्य राहणार असून या अनुषंगाने जिल्हावासियांनी कोणतीही गर्दी न करता हे दोन्ही पर्व घरीच साजरे करण्याचे आवाहन देखील ना. पाटील यांनी केले आहे.

शुक्रवार दिनांक १४ मे रोजी रमजान ईद आणि अक्षय तृतीया हे दोन्ही महत्वाचे सण एकाच दिवशी येत आहेत. या अनुषंगाने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून जिल्हावासियांना शुभेच्छा देऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

या निवेदनात ना. गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाची आपत्ती सुरू असून राज्य सरकारने लादलेले निर्बंध अजून कडक करून याचा कालावधी १ जूनपर्यंत वाढविला आहे. यातच साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय तृतीया आणि मुस्लीम बांधवांचे वर्षभरातील सर्वात महत्वाचे व मोठे पर्व असणारी रमजान ईद येत आहे. या निमित्त हिंदू व मुस्लीम बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा ! कोविड नसता तर हे दोन्ही सण आपण अतिशय चैतन्यदायी वातावरणात साजरे केले असते. मात्र आज मोठी कठीण वेळ आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात आता स्थिती थोडी सुधरली असली तरीही आपल्याला बेसावध राहून चालणार नाही.

ना. पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात सध्या उपलब्धतेनुसार लसीकरण होत आहे. काही ठिकाणी गैरसोय होत असल्याची तक्रार असली तरी येत्या काही दिवसांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर या अडचणी दूर होतील. जिल्ह्यातील ४५ वर्षावरील प्रत्येकाने लस घेऊन कोरोनाच्या प्रतिकाराला सज्ज व्हावे. लसीकरण हेच कोविडच्या प्रतिकारातील सर्वात महत्वाचे आयुध असल्याने प्रत्येकाने लसीकरण करावे असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यात जनतेने कोरोना नियंत्रण साठी प्रशासनाला मोठी साथ दिली. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटीवव्हिटीचा दर कमी झाला असून याबद्दल कॅबिनेट मिटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबत कौतुकोदगार काढले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण , जिल्हा आरोग्य अधिकारी भीमशंकर जमादार व त्यांचे सहकारी डॉ. पटोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणेच्या अथक परिश्रमांमुळेच हे शक्य झाले असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, अक्षय तृतीयेपासूनच खरीप हंगामाची लगबग सुरू होत असते. विशेष करून बियाणे, खते आदीच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांची जुळवा-जुळव सुरू होते. या अनुषंगाने यंदा बियाण्यांची कोणतीही टंचाई भासणार नाही याचे नियोजन कृषी खात्यातर्फे करण्यात आलेले आहे. २५ मे पासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी बियाणे उपलब्ध होणार आहेत. शेतकर्‍यांना बियाणे व खतांचा तुटवडा भासू देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या निवेदनात दिली आहे.

Protected Content