जिल्हा रूग्णालयातील ऑक्सीजन संपण्याच्या मार्गावर; पर्यायी व्यवस्था तयार ! (Video)

जळगाव जितेंद्र कोतवाल । जिल्हा रूग्णालयातील ऑक्सीजनचा साठा संपण्याच्या मार्गावर असतांना ऑक्सीजन घेऊन येणार्‍या टँकरच्या चालकाचा संपर्क तुटल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था केल्याने रूग्णांना पुरेसा प्राणवायू मिळणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जिल्हा रूग्णालयातील ऑक्सीजनच्या टँकमध्ये उत्पादकांकडून टँकरमधून आलेला प्राणवायू हा स्टोअर करून याला वापरण्यात येते. यात सध्याला सहा तास पुरेल इतका प्राणवायू उपलब्ध आहे. तर ऑक्सीजनचा टँकर हा आज सायंकाळपर्यंत जिल्हा रूग्णालयात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, आतापर्यंत हा टँकर आलेला नसल्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या यंत्रणेवर ताण आला आहे.

या संदर्भात या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी माहिती देतांना सांगितले की, आम्ही सायंकाळपासून टँकरच्या ड्रायव्हरशी संपर्क साधत असलो तरी संपर्क होत नसल्याने थोडा काळजीचा विषय आहे. तथापि, कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आम्ही दुसरी व्यवस्था करून ठेवलेली आहे. यात जळगावच्या औद्योगिक वसाहतीतील शिवम या ऑक्सीजन उत्पादन करणार्‍या कंपनीतून मोठे सिलेंडर भरून आणण्याची तयारी करण्यात आलेली आहे. यामुळे साधारणपणे एक-दीड तासामध्ये येथे ऑक्सीजन पोहचून प्राणवायूचा पुर्ववत पुरवठा करण्यात येईल. दरम्यान, ऑक्सीजनवर असणार्‍या प्रत्येक रूग्णाला नियमीतपणे ऑक्सीजन मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑक्सीजनची पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर होणार असल्याची माहिती डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली असून ते स्वत: जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या ऑक्सीजन टँकजवळ ठाण मांडून बसलेले आहेत.

Protected Content