साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांचा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हृद्य सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रख्यात साहित्यिक तथा प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व अथर्व पब्लिकेशन्स,जळगाव यांच्यातर्फे लग्नाच्या ३७ व्या सहजीवनाच्या यशस्वी अन् सार्थकी प्रवासाबद्दल त्यांच्या निवासस्थानी हृदय सत्कार करण्यात आला.

प्रारंभी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,जळगाव संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी चंद्रकांत भंडारी व सौ.सुनीता भंडारी यांना शाल व बुके देऊन हृद्य सत्कार करुन शुभाशिर्वाद घेतले. तसेच अथर्व प्रकाशनचे संचालक युवराज माळी व ज्येष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध मुद्रितशोधक दीपक महाले यांनी झाकीर हुसेन यांच्यावरील ग्रंथ देऊन भंडारी दांपत्याचे अभिष्टचिंतन केले. सर्वज्ञ स्मार्ट क्लासतर्फे प्रतिनिधी सुदाम बडगुजर यांनी सुद्धा अभिष्टचिंतन केले.याप्रसंगी साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांनी संवाद लेकरांशी चिंतन स्वतःशी स्वलिखित पुस्तकावर चर्चा करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात अनौपचारिक मार्गदर्शन केले.हा सदरहू पुस्तक सुदाम बडगुजर यांना सादर भेट दिले.

‘थोड्या कविता थोडी गाणी , हेच माझे अन्नपाणी ’या वृत्तीने जगणारे ग्रंथप्रेमी, सुजनशील शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी दादर मुंबई येथील सरस्वती हायस्कूलमध्ये २१ वर्ष अध्यापन केल्यानंतर वयाच्या ४४ व्या वर्षी तब्बल १४ वर्ष अगोदर स्वेच्छा निवृत्ती घेऊन आपल्या वाचन व लेखन छंदात निरंकुश परमानंदात जीवन जगताहेत ! तथापि त्यांच्यातील जातिवंत शिक्षक त्यांना स्वस्थ बसू देत नाही !शैक्षणिक प्रयोग ,विद्यार्थी व पालकांच्या प्रबोधनात निरंतर सानंद व कृतार्थ जगता याव म्हणून स्वेच्छा निवृत्तीनंतरही ते अदम्य उत्साहाने विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव येथे दोन वर्षे अध्यापन केले आणि आजता गायत १४ वर्षापासून खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीत शालेय समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत.

‘गल्ली तुमची पालक सभा आमची’ आणि ‘कुटुंब तुमचे प्रबोधन आमचे’ हे दोन पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम भंडारी राबवित आहेत . या उपक्रमाद्वारे त्यांनी ६००० पालक व ४००० विद्यार्थ्यांची सुसंवाद साधला आहे . या अभिनव उपक्रमाची शिक्षणक्षेत्रातील दिग्गज शिक्षणतज्जांनी देखल घेतली .या कार्यक्रमानुषंगे जवळपास २५००० रुपये किमतीची पुस्तके भंडारी यांनी सुजाण पालकांना विनामूल्य सप्रेम भेट दिली साहित्यिक भंडारी यांची सतरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एका संस्थेला सुमारे दोन लाखाची १५०० ग्रंथसंपदेचे वाजा गाजा न करता विनम्रपणे शालेय वाचनालयासाठी ग्रंथदान केले आहे.भंडारी यांची महाराष्ट्रात प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक व समाजशिक्षक म्हणून ओळख आहे. आयडॉल भंडारी दाम्पत्यास सुखी, समाधानी व आरोग्यदायी दिर्घायुष्याच्या शुभकामनांचा वर्षाव सर्वस्तरातील अधिकारी पदाधिकारी व आप्तेष्टांकडून होत आहे.

Protected Content