डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवत ७ लाखांच्या खंडणीची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका ४० वर्षीय डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडे ७ लाखांची खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार १९ ऑक्टोंबर रोजी चार महिलांसह ८ जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपींनी संगनमत करुन कट रचला. आणि डॉक्टरला शरीरसुखाची ऑफर देत दोघा महिलांच्या साथीदारांनी व्हिडीओ चित्रीकरण करुन घेतले. यापैकी एक महिला जळगाव शहरातील व दुसरी यावल तालुक्यातील आहे. या व्हिडीओ चित्रीकरणाच्या बळावर चेतन व हिरामन नावाच्या दोघांनी डॉक्टरला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

प्रदिप व संदीप या दोघांच्या मदतीने सात लाख खंडणीची मागणी करण्यात आली. ७ लाख रुपये दिले तरच तुमचे मॅटर संपेल नाहीतर हे व्हिडीओ व्हायरल केले जाईल व तुमची समाजात बदनामी होईल, जीवनातून उठवून टाकण्याची धमकी देण्यात आली. असे डॉक्टरने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

शेवटी या त्रासाला कंटाळून डॉक्टरने शहर पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली आहे. याप्रकरणी ४ महिलांसह चेतन राजेंद्र कासार, हिरामण एकनाथ जोशी, प्रदीप सुरेश कोळी, (सैदाणे), संदीप बबन लोंढे (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ४ महिला व ४ पुरुष अशा एकुण आठ जणांचा समावेश आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.

Protected Content