धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास देण्यात आलेले “धर्मवीर” नाव काढु नये

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील भडगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास धर्मवीर असे नाव देण्यात आले असून धर्मवीर हे नाव काढु नये अशी मागणी पाचोरा येथील विहिंप बजरंग दलातर्फे नगर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

पाचोरा नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्यास तसेच स्मारकांना अॅक्लेरिक बोर्डाद्वारे फलक लावण्यात आले आहे. भडगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास देखील “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक” असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र शहरातील समाज बांधवांनी निवेदनाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावापुढील “धर्मवीर” हे नाव काढण्यात येवुन “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक” असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

तर दि. ७ आॅक्टोबर रोजी पाचोरा विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावापुढील “धर्मवीर” हे नाव काढु नये अशी मागणी निवेदनाद्वारे नगर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांच्याकडे केली आहे.

धर्मवीर हे नाव काढल्यास विहिंप बजरंग दलातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही निवेदनकर्त्यांद्वारे देण्यात आला आहे. सदरचे निवेदन उपमुख्याधिकारी दगडु मराठे यांनी स्विकारले. या संदर्भात नगर पालिका प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नगरपालिका प्रशासन काय निर्णय घेते ? याकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content