जळगाव प्रतिनिधी । गिरीश महाजन हे आज सूडचक्राबाबत बोलत असले तरी राजकारणातील सूडाचे आपण सर्वात मोठे बळी आहोत. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पोलिसांना सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितल्याची कबुली दिली होती अशी माहिती आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
आज आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना एकनाथराव खडसे यांनी सध्या सुरू असणार्या नूतन मराठा प्रकरणावर भाष्य केले. काल गिरीश महाजन यांनी या प्रकरणी पडद्यामागे कुणी तरी असल्याचा आरोप केला होता. यावर खडसे म्हणाले की, स्वत: गिरीश महाजन हे मोठे नेते व अगदी संकटमोचक आहेत. त्यांना कुणावर आरोप करायचा असता तर त्यांनी स्पष्ट नाव घेतले असते. महाजन आज राजकीय सूडचक्राबाबत बोलत असले तरी राजकीय सूडाचे सर्वात मोठे बळी आपण ठरलो आहोत.
आपण राज्यात क्रमांक दोनचे नेते आणि तब्बल १२ खात्यांचे मंत्री असतांनाही आपल्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हा देखील कुणाचा तरी दबाव होताच. यातील कथित विनयभंगाचा गुन्हा हा मुक्ताईनगरला झाल्याचे दर्शविण्यात आले असले तरी तो गुन्हा मुंबईत दाखल करण्यात आला होता. यामुळे गुन्हा कुठूनही आणि कसाही दाखल होऊ शकतो असे खडसे म्हणाले. नूतन मराठा प्रकरणाशी आपला काडीचाही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण स्वत: पोलिसांना सांगितले होती अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती असा गौप्यस्फोटही एकनाथराव खडसे यांनी केला.
दरम्यान, जिल्ह्यातील पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असून त्यांनी याच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सुध्दा एकनाथराव खडसे यांनी दिली.
खालील व्हिडीओत पहा एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/783745552355187