गिरीश महाजनांसाठी धोक्याची वळणे ( राजकीय भाष्य )

जळगाव । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यावर अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केलेला हल्लाबोल हा अनेक अर्थांनी लक्षणीय असा आहे. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात खुबीने अनेक बाबी सांगितल्या असून याचा महाजनांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे. नेमक्या याच बाबींवर भाष्य केलेय ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी. आपल्यासाठी ते सादर करत आहोत.

जळगाव जिल्ह्याचे राजकारण सुडाच्या दुसऱ्या वळणावर आहे. यापूर्वी पहिले वळण सुरेशदादा जैन यांना कारागृहात पाठविण्याचे होते. आता दुसरे वळण माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी तयार केले जात आहे. महाजन यांचे विरोधात पोलिसात गुन्हा दाखल होऊन याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. जामिनासाठी महाजनांची धावपळ सुरू होईल. बीएचआर मल्टिस्टेट सोसायटीच्या माध्यमातून झालेले काही व्यवहार चौकशीच्या रडारवर आहे. त्यातील संशयित सुनील झवर हे फरार असून ते महाजनांचे निकटवर्ती आहेत. जळगाव शहरातील सफाईचा ठेकाही चर्चेत आहेच.

महाजन यांच्या विरोधात आज ॲड. विजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. आरोपांच्या फैरी झाडत गिरीश महाजन यांना शब्दांनी धो धो धुतला. महाजन कमरेला पिस्तुल लावून शाळेच्या कार्यक्रमात जातात आणि झाडांमागे बिबट्याला शोधतात. पण पिस्तुल जवळ न ठेवता एक एक शब्द गोळीसारखा कसा सोडला जातो हे पाटील यांनी दाखवून दिले. ॲड. पाटील यांनी अत्यंत संयमित निवेदन केले. त्यांनी काही नावे सुद्धा घेतली. पण ती मंडळी हुशार आहेत. जाहीरपणे त्यावर काहीही भाष्य करणार नाहीत. आरोपीच्या पिंजऱ्यात महाजनच असतील.

मला व्यक्तिशः पाटील बंधुंविषयी आदर आहे. जळगाव शहरात सन १९९१ च्या दरम्यान सुरेशदादांविषयी कोणी बोलू शकत नव्हते तेव्हा स्व. बबन बाहेती, स्व. नरेंद्र पाटील व स्व. उल्हास साबळे यांनी सत्तेविरोधात बोलून मला विरोधात लिहायचे बळ दिले. स्व. नरेंद्र पाटील यांना कुठेही कधीही तडजोड करताना मी व्यक्तिशः पाहिले नाही. जळगाव मनपातील गैरप्रकाराच्या विरोधात लढताना स्व. नरेंद्र पाटील यांनी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेतील दादागिरी संपविण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्याच प्रयत्नामुळे मविप्रत निवडणूक होऊन लोकनियुक्त सभासदांचे अधिकारी मंडळ पदावर आले होते. मात्र, या कारभारात मंत्री असताना महाजन यांनी हस्तक्षेप केला. नको त्या प्रवृत्तींना पाठबळ देत मविप्रत पुन्हा भांडणाचा खेळ सुरू झाला. मंत्री पदावर असताना महाजन यांनी हे करायला नको होते. तेव्हा तुम्ही जे पाप केले आता त्याचे खडे टाकून तुमचे घडे भरले जात आहेत. ॲड. विजय पाटील यांचा याच विषयावर रोष असून तो सात्विक संतापही आहे.

सध्याच्या राजकाराणाच्या खेळात कोणाच्याही विरोधात लिहिण्याचे दिवस नाही. कारण विरोधामागील कारणे वा गणित समजेलच असे नाही. या बरोबरच कोणाच्या बाजूनेही लिहावे असे दिवस नाहीत. तसे करणाऱ्याचा उद्देश आणि त्या मागील अर्थकारण लपून राहणार नाही. तरीही महाजन यांच्यावर तब्बल तासभर ॲड. पाटील यांनी केलेले सर्व आरोप मी फेसबूक लाईव्हवर ऐकले. महाजन यांनी मविप्र संस्थेत विनाकारण हात घालून स्वतःचे अवलक्षण करून घेतले आहे. ॲड. पाटील यांनी पत्रकारांना दाखविलेले पेनड्राईव्ह आणि सीडीमुळे आता वेगळीच चर्चा होईल. महाजन यांचा कोणी रामईश्वर नावाचा आरोग्य सेवक आहे. त्याच्या नावाची सीडी सध्या भलतीच चर्चेत आहे म्हणे.

मंत्रीपदावर असताना असंगाशी संग केल्याची फळे महाजन यांना भोगावी लागतील. माझेही स्पष्ट मत आहे, ‘महाजनांनी मविप्रत हात घालायची गरज नव्हतीच.’ ॲड. पाटील यांनी अनेक उदाहरणे देत महाजन यांच्या बचावाचे दावे खोडले. ३ वर्षांपूर्वीचा गुन्हा दाखल केला असे महाजन म्हणाले होते. ॲड. पाटील म्हणाले, घरकूल घोटाळा २० वर्षांपूर्वीचा होता. शिक्षा झालीच ना ? मविप्रतही जुने प्रकरण काढून मला त्रास दिला गेला. (ॲड. पाटील यांच्यानंतर एकनाथ खडसेही बोलले. म्हणाले, सुडाच्या राजकारणाचा मी पहिला बळी. राजकारणात महाजनांसाठी धोक्याची वळणे अशी सुरू आहेत.

(राजकारणी लोकांच्या कोणत्याही षडयंत्रासाठी लेखणी वापरली जाऊ नये याच हेतूने सध्या शांत आहे. जळगाव शहराचा कोणताही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न न करणाऱ्या नेत्यांविषयी सहानुभूती दाखविण्याची आज मुळीच गरज नाही.)

Protected Content