जळगाव प्रतिनिधी– माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आता जळगाव महापालिकेतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या नगरसेवकांची ‘कुंडली’ जमा करण्यास प्रारंभ केला असून यामुळे जळगाव महापालिकेतील घडामोडी गतिमान होणार असल्याचे दिसून येत आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांचे पहिले टार्गेट हे जळगाव महापालिका असेल असे आता स्पष्ट झालेले आहे. महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासोबत त्यांनी केलेली बंदद्वार चर्चा याकडे निर्देश करत आहे. दरम्यान यानंतर जळगाव महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी खडसे यांची भेट घेतली. यात विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्याकडून खडसे यांनी महापालिके विषयी माहिती जाणून घेतली.
यात विशेष करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या नगरसेवकांची कुंडली जमा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने महापालिकेत दणदणीत विजय संपादन केला होता. याप्रसंगी भाजपने दबावतंत्राचा वापर केला असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता जळगाव महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्याच्या दृष्टीने अथवा यातील गैरव्यवहार व भ्रष्टाचारावरून बरखास्त करण्याच्या दृष्टीने एकनाथराव खडसे यांचे प्रयत्न राहतील का ? याकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अर्थात जळगाव महापालिका ही जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसून येत आहे.