गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे गणेश मंडळांना आवाहन

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. यापुढील काळातही जिल्ह्यातील कोरोनाची महामारी नष्ट करण्यासाठी महामंडळाचा सक्रीय सहभाग आवश्यक असून मंडळांनी आरोग्य विषयक सामाजिक उपक्रमांना मदत करुन येणारा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

सार्वजनिक गणेशोत्सव 2020 ची पूर्वतयारी समन्वय बैठक जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे आदि उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. राऊत म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होवू नये याकरीता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरीक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करावे. नागरीकांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी मंडळांनी काम करतानाच कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमात रक्तदान, प्लाझ्मा दान विषयक जनजागृती, रुग्णांना मोफत सकस आहार पुरविणे, घरपोच आरोग्य तपासणी करण्याबरोबरच ग्रामपंचायत स्तरावर किवा प्राथमिक आरोग्य केंदस्तरावर ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांकरीता तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन (Oxygen Concencentrator Machine) उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षित व संयमाने साजरा करुया – डॉ. उगले
शासनाच्या मार्गदशक सुचनांचे पालन करुन येणारा गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षित व संयमाने साजरा करुया. गणेशमुर्तीची उंची 4 फुटापेक्षा अधिक नको, पुजा व आरतीसाठी 5 पेक्षा अधिक व्यक्ती नको, पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या ठिकाणी गर्दी करु नये. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, आवश्यक त्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले.

गांभीर्य आणि पावित्र्य राखून गणेशोत्सव साजरा करुया – श्री. कुलकर्णी
शासनाच्या नियमांनुसार सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असल्याने मंडळांनी लवकर अर्ज सादर करावे. सार्वजनिक मंडळांनी विर्सजनाच्या दिवशी घरगुती गणपतींचे दान स्वीकारावे. जेणेकरुन विर्सजनाच्यावेळी होणारी गर्दी टाळता येईल. आगमन व विर्सजन मार्गावर आवश्यक त्या सुविधा महापालिका उपलब्ध करुन देईल. मंडळांनी शासनाच्या नियमांचे गांर्भीय ओळखून व गणेशाचे पावित्र्य राखून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले.

आरोग्य उत्सव म्हणून साजरा करणार – सचिन नारळे
कोरोनाच्या महामारीचे सर्वांसमारे आव्हान आहे. चांगल्या सामाजिक उपक्रमांची पुजा मांडून कोरोनाच्या पार्श्वभूीवर साजरा होणारा गणेशोत्सव सर्व मंडळे आरोग्य उत्सव म्हणून साजरा करतील. तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले जाईल. असे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी सांगितले. यावेळी मुकुंद मेटकर, वैभव पाटील, दिपक जोशी, हेमंत महाजन, सुरेश दायमा यांनीही महत्वपूर्ण सुचना मांडल्या.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सर्वांना सादरीकरणाद्वारे दिली. बैठकीचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार रवि मोरे यांनी मानले.

 

Ganeshotsav, Corona, Collector Abhijeet Raut, Public Ganeshotsav, District Planning Bhavan, Abhijeet Raut, Dr. Punjabrao Ugle, Dr. B. N. Patil, Satish Kulkarni,

Protected Content