विद्यार्थिनींची छेडखानी; पोलीस ठाण्यात बस नेताच टवाळखोर बसमधून मारून पसार

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकाहून निघालेल्या नांदगाव-नांद्रा बसमध्ये एका टवाळखोराने विद्यार्थिनींची छेड काढल्यानंतर, चालक व वाहकाने बस गावात न नेता थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये आणल्याची घटना गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. बस थेट तालुका पोलीस ठाण्यात नेत असल्याचे कळल्यावर टवाळखोर युवक आव्हाणे फाट्याजवळ बसमधून उडी मारून पसार झाला. याप्रकरणी त्या युवकाविरोधात तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील नवीन बसस्थानकाहून (एम.एच.८०,वाय ५१९३) जळगाव-नांदगाव ही बस निघाली. दुपारची दीड वाजेची बस न गेल्यामुळे या बसमध्ये नांदगाव, कानळदा, नांद्रा, फेसर्डी या भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तर इतर प्रवाशांचीही संख्या मोठी असल्याने बस खच्चून भरली होती. बस दुपारी ३ वाजता आव्हाणे फाट्याच्या पुढे गेल्यानंतर बसमधील एका टवाळखोराने इतरांच्या साथीने बसमधील विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनींनी वाहकाकडे तक्रार केल्यानंतर वाहक लोटन पाटील यांनी संबधित टवाळखोराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही संबधित टवाळखोराकडून बसमध्ये गोंधळ घालून, विद्यार्थिनींसमोर चित्र-विचित्र हावभाव करून छेडखानी करण्याचा प्रयत्न सुरु होताच. त्यानंतर बस नांद्रा फाट्यावर आली असताना, विद्यार्थिनींना होणारा त्रास वाढल्याने, वाहक लोटन पाटील यांनी  चालक तुकाराम रायसिंग यांना बस थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये नेण्याच्या सूचना दिल्या.

नांद्रा गाव केवळ १ किमी वर असताना चालकाने बस गावात न नेता थेट जळगावकडे पुन्हा फिरवली. यामुळे पोलीसांच्या भितीने घाबरलेल्या टवाळखोर युवकाने बस थांबविण्याची विनंती केली. मात्र, चालकाने बस न थांबवता, तालुका पोलीस स्टेशनकडे नेली. बस थांबणार नाही, हे कळल्यामुळे संबधित युवकाने पोलीसांकडे नाव सांगणाऱ्यांना थेट चॉपर दाखवून धमकी दिली. त्यातच आव्हाणे फाट्याजवळ युवकाने चालत्या बसचा दरवाजा उघडून उडी मारून, त्याठिकाणाहून पसार झाला. मात्र, चालकाने तरीही बस तालुका पोलीस स्टेशनला आणली. या प्रकरणी विद्यार्थी, चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोखंडे करत आहेत.

Protected Content