मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुटले; सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत !

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आमरण उपोषण आज सरकारशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेतले आहे. सरकारला दोन जानेवारीपर्यंत मुदत देत त्यांनी हा निर्णय घेतला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंतरवली सरांगी गावात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनास मोठा पाठींबा मिळाला होता. त्यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी अनेकांनी उपोषण सुरू केले होते. तर अलीकडच्या काळात या आंदोलनाचे तीव्र पडसाद देखील उमटले होते. यामुळे बीडसह परिसरात इंटरनेट बंद करण्यात आली होती.

दरम्यान, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून सर्वपक्षीय चर्चा केली. यानंतर आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. यात त्यांनी सात डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होत असून दुसर्‍याच दिवशी मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. तसेच मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे समितीला आरक्षणाबाबत अध्ययन करण्यासाठी वेळ मिळावा अशी अपेक्षा देखील मुंडे यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने मागण्यांबाबत अनुकुलता दर्शविल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तर आरक्षणाचे उपोषण स्थगित करतांना त्यांनी राज्य शासनाला दोन जानेवारी पर्यंत मुदत दिली. या मुदतीत आरक्षण न मिळाल्यास पुन्हा लढा उभारण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यानंतर त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आपले उपोषण सोडले.

Protected Content