लेखणी बंद नव्हे…हे तर ब्लॅकमेल आंदोलन- देवेंद्र मराठे यांचा आरोप

जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचार्‍यांनी सुरू केलेले लेखणी बंद आंदोलन हे ब्लॅकमेल आंदोलन असल्याचा आरोप एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे.

जळगाव जिल्हा एन एस यु आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी विद्यापीठांमधील सुरू असलेल्या लेखणीबंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर एका पत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका व्यक्त केली आहे. यात म्हटले आहे की, आधी भाजप मग राज्यपाल नंतर यूजीसी व केंद्र सरकार आता मात्र विद्यापीठाचे कार्यालयीन कर्मचारी सर्वजण आपापल्या स्वार्थासाठी विद्यार्थ्यांचा वापर असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या चार महिन्यांपासून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील घोळ सुरू असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने परीक्षा रद्द चा निर्णय घेतला. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये बहुमताच्या आसपास आमदार निवडून आल्यानंतर देखील राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यास मिळाले नाही, या रागाच्या हेतू पोटी भाजप पक्षाने आपल्या विद्यार्थी आघाडी सोबत राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी परीक्षा रद्दच्या निर्णयात विरोधात राजकारण सुरू केले. भाजप पक्ष व अभाविप संघटना राजकारण करीत असतानाच त्यात उडी घेतली ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगवान कोशियारी यांनी…! राज्यपालांचे राज्यामध्ये परीक्षेसंदर्भात हट्टीपणा सुरू असताना हा हट्टीपणा थेट जाऊन पोहोचला तो म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या दरबारामध्ये..!

केंद्र सरकारने भाजप पक्षाच्या नेत्यांचा हट्ट पुरवण्या करता परीक्षेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचवला. तर, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय आदराने स्वीकारला व विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीसाठी लागले. अंतिम वर्षाच्या परीक्षेचे सर्व प्रक्रिया पार पडत असताना आता १ ऑक्टोंबर पासून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या सुरू होतील असे असतानाच राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कार्यालयीन अधिकारी पासून ते चतुर्थश्रेणी च्या कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांनीच २४ सप्टेंबर पासून राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन सुरू केले.

आंदोलनाच्या मागण्या ह्या केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थाच्या म्हणजेच कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, तसेच पेन्शन धारकांच्या पडीत असलेले इतर सर्व प्रकरणे निकाली काढणे या संदर्भातल्या मागण्या आहेत व या लेखणीबंद आंदोलनामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले व त्या अनुषंगाने राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या अजून पुढे ढकलल्या गेल्या. एकंदरीतच या सर्व पार्श्‍वभूमीवरुन एकच खंत वाटते की लॉक डाऊन मुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये आपल्या सर्वांना शिकायला मिळाली ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी… परंतु आता कुठं तरी वाटतं की या लेखणीबंद आंदोलनकत्यांना माणुसकीचा मात्र विसर पडलेला असल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे.

आधीच परीक्षेच्या नावाखाली सर्वप्रथम भाजप पक्षाने त्यानंतर राज्यपालांनी त्यानंतर यूजीसी व केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या स्वार्थी राजकारण करता विद्यार्थ्यांचा वापर करीत आपले स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकून घेतल्या. परंतु आता राज्यातील विद्यापीठांचे कर्मचारी सुद्धा मागे राहिले नाही व त्यांनी सुद्धा आपल्या वाढीव पगाराच्या मागणी पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांना हाताशी धरून व वेठीस धरून विद्यार्थ्यांच्या नावाखाली राज्य सरकारला ब्लॅकमेल करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, एकंदरीतच सर्वच जण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ सुरू केलेला आहे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असतं,हे फक्त ऐकण्यात आणि बोलण्यातच चांगलं वाटतं. त्याचा वास्तविक जीवनामध्ये कोणीही सकारात्मक रीत्या विचार करीत नाही व त्या अनुषंगाने आज हे आंदोलन कर्ते विद्यार्थ्यांना वेठीस धरून आपल्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागे लागलेले आहेत.

लॉक डाऊनमुळे व परीक्षेसंदर्भातील घोळामुळे आधीच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना विलंब झालेला असताना परीक्षेची सर्व तयारी झालेली असताना अचानकपणे कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे परीक्षा ह्या पुढे ढकलल्या गेल्या परंतु आंदोलन करतांना आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण वर्ष पडलेला आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यात असा खेळ करून आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या यासंदर्भातला विचार अतिशय चुकीचा आहे.

विद्यार्थ्यांच्या जागी आपल्या स्वतःच्या मुलांना ठेवून आंदोलन कर्त्यांनी हे आंदोलन तात्काळ मागे घ्यावे व विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचे कामकाज विद्यापीठांमध्ये तात्काळ सुरू करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया व इतर काही गोष्टींसाठी जाण्यासाठी त्यांना मार्ग मोकळा होईल व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या संदर्भातली मागणी जळगाव जिल्हा एन एस यु आय च्या वतीने करण्यात आली आहे.

Protected Content