विवाह सोहळे व अंत्ययात्रेतील गर्दी आवरा- जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन निर्देश जारी केले असून यात विवाह सोहळे व अंत्ययात्रेत कमी गर्दी करण्याचे सूचित केले आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन निर्देश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की,

* शाळा, महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी मास्क, सॅनिटाइजरचा वापर करावा लागेल. सार्वजनिक उद्याने सकाळी ५ ते ९ या वेळेत खुले राहतील. सिनेमागृहात मास्क हवाच.

* बाधितांच्या संपर्कातील २० व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. विषाणूचा संसर्ग कोठून झाला ती ठिकाणे शाेथा. बाधीत रुग्णसंख्येत वाढ झालेल्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करा.

* जास्त गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाही. उपहार गृहे, बार, हॉटेल व तत्सम ठिकाणे ५० टक्के क्षमतेसह सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरु राहतील. शासकीय कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक.

* सौम्य लक्षणे असलेल्या कोवीड १९ बाधित किंवा संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरणाची परवानगी घेऊन त्याबाबत तपासणी करण्यात यावी.

* लग्न समारंभांना ५० वऱ्हाडींनाच परवानगी असेल. पोलिस ठाणे व स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. मास्क नसलेले व्यक्ती दिसले तर कारवाई हाेईल.

* जनरल प्रॅक्टीशनर डॉक्टरांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती घ्या. संशयित असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी.

* कंटेन्मेंट झाेनचे उल्लंघन केले तर कारवाई करा. सिटी स्कॅन संेटर, खासगी रेडिओलॉजीस्ट, पॅथालॉजी प्रयोगशाळांनी संशयितांचा अहवाल मनपा व ग्रामीण रुग्णालयाकडे सादर करावा.

डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर, कोविड केअर संेटरची तपासणी करण्यात यावी. या रुग्णालयांचची तपासणी करुन त्यात आवश्यक साहित्य कोणत्याही क्षणी वापरता येतील, अशा स्थितीत ठेवण्याची जबाबदारी मनपा आयुक्त, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्याधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे.शहरातील हाॅटेल, मंगल कार्यालये, सार्वजनिक व खासगी कार्यक्रमांत हाेणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांना ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणाची माहिती प्रशासनाकडे देता येईल अशी व्यवस्था केली जाणार अाहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त असेल. मिळालेल्या माहितीनंतर प्रशासनाचे पथक तेथे जावून कारवाई करेल.

Protected Content