. . .आणि जिल्हाधिकार्‍यांमुळे मध्यप्रदेशातून मिळाली कोविडची मदत !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगावचा रहिवासी असणार्‍या व्यक्तीचा बर्‍हाणपूरला मृत्यू झाल्याने त्याच्या मुलास शासकीय मदत मिळत नव्हती. या प्रकरणी डॉ. नि. तु. पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. याची दखल घेऊन अभिजीत राऊत यांनी त्या तरूणाला मध्यप्रदेशातून मदत मिळवून दिली.

वरणगाव येथील डॉ. नि. तु. पाटील हे सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक उपक्रम राबवत असतात. विशेष करून कोविडच्या काळात त्यांनी कोरोना योध्द्यांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. आता त्यांच्या पुढाकारामुळे कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसाला मदत मिळाली आहे. अर्थात, यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सहकार्य देखील निर्णायक ठरले आहे. या संदर्भात डॉ. नि. तु. पाटील यांनी आपल्या भावना सोशल मीडियात एका पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

डॉ. नि. तु. पाटील यांची पोस्ट खालीलप्रमाणे आहे.

प्रामाणिक प्रयत्नांना, प्रशासकीय सात्विक साथ…!

मित्रहो, अजूनही करोना सेवा कार्य सुरू आहे.

वरणगाव येथील रेणुका नगर मध्ये श्री. सदाशिव राजधर चौधरी हे पिठगिरणी चालवत आपला संसार सुखासमाधानाने करत होते.पण काळाच्या मनात मात्र काही वेगळेच सुरू होते.

श्री. चौधरी यांना जून 2020 मध्ये करोना संक्रमण झाले. मग तातडीने सामान्य रुग्णालय,जळगाव याठिकाणी भरती करण्यात आले.पुढील 15 दिवसांत अपेक्षित असा फरक पडत नसल्याने मग एका खाजगी रुग्णालयात भरती केले पण तेथे देखील तीच परिस्थिती असल्याने पुढे त्यांना बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश याठिकाणी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. पण नियतीला काही हे पाहावले गेलं नाही आणि मग जुलै 2020 मध्ये त्यांची प्राणज्योत मावळली.

असेंच दिवस निघून गेले.

करोनाची दुसरी लाट आली.यावेळी भारत सरकारने जे करोना संक्रमित झाल्याने मरण पावले अश्यांच्या वारसांना रु.50,000/- देण्याचे परिपत्रक काढले.

मग सुरू झाली ती धावपळ…!

कै. चौधरी यांचा मुलगा कृष्णा याने रुग्णालयात जाउन सर्व कागदपत्रे जमा केली.महाराष्ट्र सरकारी संकेतस्थळावर अर्ज भरला,पण उत्तर आले,
“,कै. चौधरी यांचा मृत्यू दाखला हा मध्यप्रदेशचा असून महाराष्ट्र सरकारद्वारे मदत मिळणार नाही”.

मग काय परत मध्यप्रदेश सरकारी संकेतस्थळावर अर्ज भरला दि.23 एप्रिल 2022,मग सुरू झाले ते फक्त वाट पाहणे……!
दर 15 दिवसांनी कृष्णा संकेतस्थळावर पाहायचा,एकच माहिती दिसायची ” Application In process”

तसेच स्वतः हा बुऱ्हाणपूर ला अधिकारी वर्गाला भेटला, पण उत्तर एकच,”
तुम्ही महाराष्ट्र चे रहिवासी आहात, मध्यप्रदेश सरकार कशी मदत करेल?”

दोन्ही बाजूंनी टोलवाटोलवी…!

दि.26 जुलै ला कृष्णा मला भेटला,सर्व हकीकत सांगितली.मी कागदपत्रे जमा केली.मी लगेच सर्व हकीकत आपले जिल्हाधिकारी साहेब श्री.अभिजीतजी राऊत यांना सांगितली तसेच कागदपत्रे व्हाट्सएपच्या द्वारे पाठवली. त्यांनी लगेच बऱ्हाणपूर तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत सर्व माहीती दिली.

दि.27 जुलै ला मला जिल्हाधिकारी कार्यालय, बऱ्हाणपूर येथून फोन आला,चर्चा झाली. मग दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्रे घेऊन कृष्णा बुऱ्हाणपूरला गेला.

विशेष म्हणजे जेव्हा कृष्णा यांनी भेटण्यासाठी चिट्टी पाठवली तेव्हा बऱ्हाणपूर जिल्हाधिकारी साहेब स्वतः ऑफिसच्या बाहेर कृष्णाला भेटायला आले. माहिती घेतली मग अप्पर जिल्हाधिकारी साहेब आणि संबंधित अधिकारी वर्गाला सदर प्रकरण लवकरात लवकर म्हणजे 15 दिवसांत निधी वर्ग करण्याच्या सूचना दिल्या…!

कृष्णा आज बँकेत काही कामानिमित्त खातेपास बुक घेण्यासाठी गेला असता त्याला आईच्या खात्यावर रु.50,000/- जमा झाले असल्याचे दिसले(दि.17.08.2022)लागलीच त्याने याबाबत मला वासुदेव नेत्रलयात भेट घेत सांगितले…

या प्रवासात आपले जळगाव जिल्हाधिकारी साहेब अभिजित राऊत, बऱ्हाणपूर जिल्हाधिकारी प्रविणजी सिंह,अप्पर जिल्हाधिकारी शैलेंद्रसिंहजी सोलंकी तसेच संबंधित अधिकारी किशनजी कामेश या सर्वांची फार मोलाची मदत झाली,या सर्वांचे लाख लाख धन्यवाद…!💐

एक मात्र नक्की,आपल्या जळगाव जिल्हाचे मा. जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत यांचा डंका मध्यप्रदेश मध्ये देखील जोरात वाजतो…!💐

डॉ. नि. तु.पाटील

उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक ,
वैद्यकीय आघाडी,भारतीय जनता पार्टी ,
महाराष्ट्र राज्य
मो.8055595999
दि. 20.08.2022

Protected Content