‘त्या’ तरूणीला मनोरूग्णालयात दाखल करण्याचा अर्ज कोर्टाने फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । आशादीप वसतिगृहातील गैरप्रकाराचे आरोप करणार्‍या तरूणीला मनोरुग्णालयात दाखल करावे या मागणीसाठी केलेला अर्ज सीजेएम कोर्टने फेटाळून लावला आहे.

आशादीप वसतीगृहातील प्रकरण खूप गाजले. या कथित प्रकाराबाबत जननायक फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार केली होती. मात्र यातील तरूणी ही मनोरूग्ण असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील ६ सदस्यीय समिती आशादीप वसतीगृहाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करीत आहे. त्या समितीमध्ये मानसोपचार तज्ज्ञाचाही समावेश आहे.

संबंधीत समितीने शासनाला सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ती युवती सायकॉसीस स्किझोफ्रेनिया ग्रस्त असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. तिने वसतिगृहातील गर्भवती महिलेलाही मारहाण केली होती. त्या युवतीच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने आशादीप वसतीगृह प्रशासनातर्फे त्या युवतीला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्याबाबत अर्ज सीजेएम एस. एन. फड यांच्या कोर्टात सादर करण्यात आला होता.

युवतीच्यावतीने अ‍ॅड. सेजल अग्रवाल यांंनी कामकाज पाहिले. यावर झालेल्या सुनावणीत त्या युवतीचा घटस्फोट झालेला आहे. ती पूर्णत: मनोरुग्ण नाही. ती तणावात होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तिने शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. तिला कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याचे अ‍ॅड. अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र पूर्ण सुनावणी झाल्यानंतर न्यायाधिशांनी तिला मनोरूग्णालयात दाखल करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळून लावला.

Protected Content