मुलाच्या नरबळी प्रकरणी अखेर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी । आजारी मुलास बरे वाटावे म्हणून दहा वर्षाच्या बालकाचा नरबळी दिल्या प्रकरणी तालुक्यातील डांगर बुद्रुक येथील १६ जणांविरूध्द न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, ७ एप्रिल २०२० रोजी सुदर्शन राठोड या बालकाचा खून झाला होता. त्याचा मृतदेह पाझर तलावाजवळ टिका लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यामुळे त्याचे वडील सुभाष बसराज राठोड यांनी पोलीसात तक्रार दिली. मात्र त्यांचे म्हणणे कुणी ऐकले नाही. यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने आपल्या निकालातून हा नरबळीचा प्रकार असून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

मृत बालकाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार- डांगर बु. येथील इंदल हिरामण चव्हाण यांचा मुलगा झिंग्या (वय साधारण १२ वर्षे) हा नेहमी आजारी राहत होता. तो बरा व्हावा म्हणून इंदल याने मांत्रीकाच्या मदतीने नरबळी देण्याचे ठरविले. या अनुषंगाने ७ एप्रिल २०२० रोजी शेतात जेवणाचा कार्यक्रम ठेवला. या जेवणासाठी त्यांनी गावातीलच सुभाष राठोड यांचा मुलगा सुदर्शन याला निमंत्रण दिले. त्याला घरून घेऊन येण्यासाठी झिंग्याला पाठवले. शेतात आल्यावर सुदर्शनच्या कपाळावर टिळा लावून गळ्यात मिरची, लिंबूची माळ घालून त्याची पूजा करण्यात आली. नंतर त्याला शेताजवळील पाझर तलावात त्याला बुडवून ठार मारण्यात आले.

यानंतर खूप प्रयत्न करून १६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून यात मांत्रिकाचा समावेश आहे. दोषींमध्ये रोहिदास हिरामण चव्हाण, कनिराम हिरामण चव्हाण, इंदल हिरामण चव्हाण, योगेश कनिराम चव्हाण, रामसिंग नंदा चव्हाण, दादू रोहिदास चव्हाण, नीलेश रोहिदास चव्हाण, सोनी रोहिदास चव्हाण, निकिता इंदल चव्हाण, चंद्रकला कनिराम चव्हाण, तुळसाबाई रोहिदास चव्हाण, भारती इंदल चव्हाण, ताई रामसिंग चव्हाण, शंकर रामसिंग चव्हाण, नवसाबाई हिरामण चव्हाण (सर्व रा. डांगर बु.) आणि मांत्रीक ज्ञानेश्‍वर चव्हाण (रा. रणाईचे) यांचा समावेश आहे.

Protected Content