अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालखी सोहळा आणि दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी गावातून भक्तिमय वातावरणात दिंडी काढत वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात रंगून गेले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळमसरे येथे आयोजित या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पालखीचे पूजन करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात गावातून दिंडी काढली. यावेळी भक्तिगीतांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दिंडी ग्रामपंचायत कार्यालय, राम मंदिर, महाराणा प्रताप चौक आणि दत्त मंदिर मार्गे संपूर्ण गावातून फिरली. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संदेश देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. धार्मिक परंपरेसोबत सामाजिक संदेश देणारा हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कळमसरेचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, गावातील पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे आणि शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमानंतर उपसरपंच जितेंद्र राजपूत यांनी सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप केले, तर नथू चौधरी यांनी विद्यार्थ्यांना गोड खाऊ देऊन त्यांचा उत्साह वाढविला. यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात अधिक भर पडली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक किशोर सिसोदे, केशव बडगुजर, श्रीमती शैला पाटील, भरत जाधव आणि श्रीमती जयश्री बडगुजर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे पालखी सोहळा आणि दिंडी शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.



