जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा समन्वय साधत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उपक्रमातून पर्यावरणपूरक कार्यसंस्कृतीचा संदेश देण्यात आला.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात प्रथम कार्यालय परिसराची व्यापक स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिकसह इतर कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, असे प्रतिपादन केले. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, हरित आणि प्रसन्न ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वृक्षारोपणाइतकेच लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन व संवर्धन करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जितेंद्र कुवर, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) विजयकुमार ढगे, तहसीलदार श्री. सूर्यवंशी, उमा ढेकळे तसेच ‘वी-ड्रीम सेवाभावी संस्था’चे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियानादरम्यान कार्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांनी प्रत्येक रोपाची नियमित काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता आणि हरित परिसराचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे कार्यालय परिसर अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची, प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्याची आणि लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.



