Home Cities जळगाव आषाढी एकादशीनिमित्त उत्कर्ष मतिमंद मुलांच्या शाळेची भक्तिमय दिंडी 

आषाढी एकादशीनिमित्त उत्कर्ष मतिमंद मुलांच्या शाळेची भक्तिमय दिंडी 

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त उत्कर्ष मतिमंद मुलांची शाळा, जळगाव येथे भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विशेष विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात सहभाग घेत भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी संदेश दिला. या उपक्रमाला पालक आणि नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या नामघोषांनी परिसर भक्तिमय झाला. टाळ-मृदंगाच्या निनादात काढण्यात आलेल्या दिंडीमुळे आषाढी एकादशीचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.

विशेष विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी होत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत विद्यार्थ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव विशेष लक्षवेधी ठरला. दिंडी मार्गावर नागरिकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमामागील मुख्य उद्देश विशेष मुलांमध्ये भक्तीभाव, सांस्कृतिक परंपरांची ओळख, सामाजिक सहभागाची भावना आणि आत्मविश्वास वाढविणे हा होता. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने शाळा व्यवस्थापनाने हा उपक्रम आयोजित केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे दिंडी सोहळा आनंदी, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापनाने सर्व सहभागी, पालक आणि सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.


Protected Content

Play sound