जळगाव प्रतिनिधी । खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे राज्यभरातील कृषी सेवा केंद्रांना सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिले आहेत.
सध्या ब्रेक द चेनच्या अंतर्गत राज्यभरात कडक निर्बर्ंध लागू करण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी सात ते अकरा या चार तासांमध्येच खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यात कृषी सेवा केंद्रांचाही समावेश आहे. अर्थात, कृषी केंद्र देखील सध्या चारच तास सुरू ठेवण्यात येत आहेत. मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. कारण खरीप हंगाम लवकरच सुरू होणार असल्याचे शेतकर्यांची कृषी केंद्रांवर वर्दळ वाढणार असतांना फक्त चार तास दुकाने खुली ठेवल्याने शेतकर्यांना अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे कृषी केंद्रांची वेळ वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
या अनुषंगाने राज्याच्या कृषी आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकार्यांना कृषी सेवा केंद्रांना सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी असे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकरी त्यांना आवश्यक असणारी सामग्री ही गर्दी न करता खरेदी करू शकतील. दरम्यान, कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार आता जळगावसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कृषी केंद्रांची मर्यादा वाढविण्याचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.