‘त्या’ बालिकेला जीवे ठार मारणाऱ्या निर्दयी आई-वडीलांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय बालिकेला तिच्या आईवडीलांनी अपशकुनी समजून शारिरीक व मानसिक छळ करून जीवे ठार केले. नातेवाईकांना न कळविताच मृतदेह कब्रस्थानात पुरल्याचा खळबळजनक प्रकार काल मंगळवारी समोर आला होता. आज सायंकाळी मयत बलिकेच्या आईवडीलांवर रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत मुलीचा मामा व आजोबा अजहर अली शौकत अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, केमिस्टचे काम करणाऱ्या जावेद अख्तर शेख जमालोद्दिन रा. रझा नगर पिंप्राळा हुडको हा पत्नी नाजीया परविन जावेद अख्तर व कानीज फातेमासह दोन यांच्यासोबत राहतो. कानीजच्या जन्मानंतर काही दिवसांत दिवसांत जावेदच्या आईचे निधन झाल्याने कनीज फातेमा नावाची ही मुलगी कुटुंबासाठी अपशकुनी आहे, असा समज होऊन जावेदने तिचा छळ सुरू केला होता, ती दोन वर्षांची असताना जावेदच्या मेडिकल स्टोअरला आग लागून त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तेव्हापासून छोट्या कनीजचा जास्तच छळ त्याने सुरू केला. तिचे डोके भिंतीवर आपटणे, दोन दोन दिवस तिला जेवायला न देणे, कोंडून ठेवणे, मारणे, तिची आंघोळ न घालणे, औषधपाणी न करणे, असे असा अमानुष छळ  तो करीत होता. हा छळ सहन न झाल्याने कनीजच्या नाना-नानीने तिला आपल्या घरी नेले. तरीही तिला भेटण्याच्या निमित्ताने तिचे आई-वडिल त्यांच्या घरी जात व काही दिवसांसाठी म्हणून तिला घरी आणून पुन्हा तिचा छळ करीत, असे अर्जात म्हटले आहे. २५ एप्रिलच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास जावेदने घरमालक आरीफ खान यांना झोपेतून उठवले आणि आपल्या मोठ्या मुलीचे निधन झाल्याचे त्यांना सांगितले. सकाळी तिचे काका घरी आले. त्यांच्यासह परिसरातील मोजक्या लोकांनीच कब्रस्तानात जाऊन तिचा दफनविधी केला. हा प्रकार जावेदने सासु व सासरे यांना कळविले नव्हते. शेजारचांच्या लक्षात आल्याने दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी त्यांनी मयत कानीजच्या मामा व आजीआजोबांना फोनद्वारे घटनेची माहिती कळविली. मामा व आजी-आजोबा तातडीने जळगाव दाखल झाले. भाचीवर केलेल्या छळाबाबत पोलीसात जावीद अख्तर शेख जमालोद्दीन (हुडको), शेख साजीद अख्तर शेख जमालोद्दीन, फिरोज अख्तर शेख  जमालोद्दीन (अमळनेर), निलोफर परवीन निसार खान (धुळे) यांनी इतरांना न कळविता परस्पर दफन केला आहे असा तक्रार अर्ज केला. 

दरम्यान, दोघांची पोलीसांनी कसून चौकशी केली. आज बुधवारी सकाळी तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला व जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी मयत बालिकेच्या मामा अजहर अली शौकत अली यांच्या फिर्यादीवरून वडील जावेद अख्तर शेख जमालोद्दिन आणि नाजीया परविन जावेद अख्तर यांनी संगनमत करून पोटच्या मुलीला जीवे ठार मारल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक बिरारी करीत आहे. 

Protected Content