जळगावसह देशातील ३५ जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढविण्याचे निर्देश

मुंबई । कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असणार्‍या देशातील ३५ जिल्ह्यांमध्ये निदान करणार्‍या चाचण्या वाढविण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिले असून यात जळगावचाही समावेश आहे.

महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील एकूण ३५ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्ण आणि मृत्यूदर अधिक असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, गुजरात, झारखंड आणि पाँडेचेरीच्या आरोग्य सचिवांशी संवाद साधला. या बैठकीत संबंधीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि अन्य यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.

यात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय करण्याबरोबरच बाधितांचा शोध घेताना अन्य आजार असलेले रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना संबंधित राज्यांना देण्यात आल्या. यासोबत पहिल्या टप्प्यातील रुग्णनिदान करण्यासाठी आणि संसर्ग साखळी तोडण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आणि आरटी-पीसीआर चाचण्या करण्याचे निर्देशही देण्यात आले.

यासोबत तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्या करोना रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करा.गृहविलगीकरणावर बारीक लक्ष ठेवा. कोरोनाची गंभीर लक्षणे दिसताच रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करावे. आणि संसर्ग प्रतिबंधांसाठी आरोग्य कर्मचार्‍यांनीही आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे सुचविण्यात आले आहे.

देशातील कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णवाढीच्या ३५ जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील १७ जिल्हे आहेत. यात मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, धुळे, अहमदनगर, रायगड, नांदेड व औरंगाबादचा समावेश आहे.

Protected Content