गोळीबार प्रकरणात पाच संशयितांना पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । चौगुले प्लॉट परिसरात झालेल्या दोन गटांमधील हाणामारी आणि गोळीबार प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून सारवान गटातील पाच जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, व्हाटसअपवर स्टेटसवरून चिथावल्याने शहरातील शनि पेठ परिसरातील चौगुले प्लॉट भागात ११ एप्रिल रोजी सायंकाळी राडा झाला होता. यात एका गटाने गोळीबार केला होता. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनि पेठ पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी अमृत यशवंत शिंदे (वय ४२, रा. चौगुले प्लॉट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सारवान गटातील सात जणांवर मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निलेश हंसकर याने दिलेल्या फिर्यादीवरून विजय जयवंत शिंदे, राहुल अशोक शिंदे, किशोर जयवंत शिंदे, राकेश उर्फ लिंबु राक्या चंद्रकांत साळुंखे या चौघांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला, मारहाण व बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर एका गटातील राम उर्फ सोनु भगवान सारवान (वय २५), सुनील उर्फ लखन भगवान सारवान (वय ३१), नीलेश नरेश हंसकर (वय २३), सनी राजु मिलांदे (वय १९) व पंकज भानुदास चौधरी (वय २४, सर्व रा. गुरुनानकनगर, शनिपेठ) या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

सारवान गटातील अटकेत असलेल्या पाच संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या पाचही जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसर्‍या गटातील सर्व संशयित बेपत्ता झालेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेेत.

Protected Content