…तर दालनास कुलूप ठोकणार : पदाधिकार्‍यांचा इशारा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विद्यार्थी कल्याण अधिकार्‍यांची बेकायदेशीर नियुक्ती रद्द न केल्यास आपण त्यांच्या कार्यालयास कुलूप ठोकणार असा इशारा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक राष्ट्रवादीचे कुणाल पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी दिला आहे.

जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील कुलकर्णी हे एका राजकीय पक्षाचे म्हणजेच भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जळगाव विभाग प्रमुख म्हणजेच एक राजकीय पदाधिकारी असताना देखील त्यांनी विद्यापीठ प्रशासनाची फसवणूक केली व विद्यापीठ प्रशासनाने देखील त्यांच्या राजकीय पदाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्यांची विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून बेकायदेशीर रित्या नेमणूक केली असल्याचा आरोप जळगाव जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कुणाल पवार, युवा सेनाचे पियुष गांधी, अंकित कासार, भूषण भदाने, निलेश चौधरी, अमोल मोरे आदी पदाधिकार्‍यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकाराचा निषेध व्यक्त करण्याकरता काल सर्व पदाधिकार्‍यांनी सुनील कुलकर्णी यांना घेराव धरण्याचे ठरविले होते. परंतु सुनील कुलकर्णी हे लागताच विद्यापीठ परिसरांमधून निघून गेले. जेव्हा हे पदाधिकारी त्यांच्या दालनामध्ये गेले असता त्यांच्या दालनातील कर्मचार्‍यांनी आज सुनील कुलकर्णी हे अचानक कुठे तरी घाई घाईने निघून गेले, या पद्धतीचे उत्तर दिले.

त्यानंतर जळगाव जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी कुलगुरू डॉ माहेश्वरी सर यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली व ३१ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून आपण डॉ. सुनील कुलकर्णी यांच्यावरती काय कारवाई केली..? याबाबतचे विचारणा केली. परंतु विद्यापीठाने डॉ.सुनील कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे व त्यांच्या जवळील विद्यार्थी कल्याण अधिकारी या विभागाचा अतिरिक्त कारभार देखील लवकरच काढण्यात येईल व त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात येईल या पद्धतीचे आश्वासन कुलगुरू महोदयांनी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना दिले.

परंतु जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी कुलगुरू महोदय यांना या संपूर्ण कामाकरता दोन दिवसांचा अवधी दिला. दोन दिवसांनी मात्र विद्यापीठामध्ये ठिय्या आंदोलन करत बेकायदेशीर नियुक्ती रद्द होईपर्यंत व त्या जागी नवीन विद्यार्थी कल्याण अधिकारी नेमण्यापर्यंत त्यांच्या दालनाला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.

Protected Content