भरधाव वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

accident

जळगाव प्रतिनिधी । महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असतांना शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एका भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर कोणीही मदतीला येत नसताना भुसावळ येथून आरोपींना घेऊन येणाऱ्या एमआयडीसी पोलिसांनीच जखमीला पोलीस व्हॅनमधून जिल्हा रुग्णालयात हलविले.

याबाबत माहिती अशी की, फैजपूर येथून नातेवाईक यांच्याकडे लग्न असल्याने लग्नालावून संजय कृष्णा कोळंबे (वय ५०, रा. गुजराल पेट्रोलपंप परिसर, जळगाव) जळगावला दुचाकीने शालक महेंद्र भोळे (रा. पुणे) यांच्यासोबत येत असतांना जळगावनजीक असलेल्या दूरदर्शन टॉवरजवळ रस्त्याच्या कडेला पीयूसीचे वाहन दिसल्याने ते दुचाकीच्या पीयूसीसाठी थांबले. त्यावेळी महेंद्र भोळे हे दुचाकीच्या खाली उतरले व कोळंबे हे रस्त्याच्या दुसऱ्‍या कडेला असलेल्या पीयूसी वाहनाकडे जात असतानाच जळगावकडून भुसावळला वाळू घेऊन जाणाऱ्‍या भरधाव डंपरने (क्रमांक एमएच १९, सीवाय – ३१२४) दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, डंपरने दुचाकीला फरफटत नेले. त्याच वेळी कोळंबे यांच्या पायावरून डंपरचे पुढचे चाक गेल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले.

पोलीस धावले मदतीला
अपघातानंतर जखमी जागेवर विव्हळत असताना येणारे-जाणारे कोणीही थांबत नव्हते. त्याच वेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार हेमचंद्र झोपे, पोहेकॉ सुनील पाटील, रवींद्र महाले, चालक राजेंद्र पवार हे खुनातील दोन आरोपींना भुसावळ न्यायालयातून जळगाव येथे कारागृहात घेऊन येत होते. त्यांनी अपघातस्थळी थांबून जखमीला तत्काळ पोलीस व्हॅनमध्ये टाकून जिल्हा रुग्णालयात हलविले.

हेल्मेटमुळे वाचला जीव
कोळंबे यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले होते. त्यामुळे धडकेनंतर ते खाली पडूनही त्यांना इजा झाली नाही. मात्र दोन्ही पायावरून डंपरचे चाक गेल्याने दोन्ही पायाचा चेंदामेंदा झाला. आतील मांस दिसत असल्याने पोलिसांनी जखमीच्या तोंडावर रुमाल बांधून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले.

चालकासह डंपर एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात
कोळंबे यांना जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर उपचारादरम्यानही वेदना असह्य होत असल्याने त्यांनी गायत्री मंत्राचा अखंड जाप सुरू ठेवला होता. एमआयडीसी पोलिसांनी जखमीला जिल्हा रुग्णालयात आणत असतानाच डंपरच्या चालकालाही ताब्यात घेऊन त्याला जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत आणले.

Protected Content