महावितरणच्या भरारी पथकांची जिल्ह्यात ११२ जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । महावितरणच्या भरारी पथकांनी जळगाव जिल्ह्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत वीजचोरीची ११२ प्रकरणे उघडकीस आली. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. 

महावितरणच्या कोकण, औरंगाबाद व नागपूर प्रादेशिक कार्यक्षेत्रातील १२ भरारी पथकांनी जळगाव व भुसावळ विभागात २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजमीटरची व वीजजोडणीची तपासणी केली. त्यात ८२ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून व आकडे टाकून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. तर ५ ग्राहकांनी भार बदलणे किंवा वीजवापराचे प्रयोजन बदलणे अशा प्रकारे अनधिकृत वीज वापर केल्याचे आढळले. २५ ग्राहकांनी इतर अनियमितता केल्याचे दिसून आले. 

या सर्व ग्राहकांवर विद्युत कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. त्यांना वीजचोरीचे ३४ लाख ८५ हजार रुपयांचे अनुमानित बिल देण्यात आले आहे. हे बिल न भरल्यास त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदविला जाणार आहे. या कारवाईमुळे वीजचोरांमुळे खळबळ उडाली आहे.

कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमीतकुमार, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे सहायक संचालक सुनील थापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

Protected Content