जळगाव, प्रतिनिधी | ओमायक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमिवर, जिल्हा प्रशासनाने आज रात्रीपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. जाणून घ्या नवीन नियमावली नेमकी कशी असेल ?
या संदर्भात वृत्त असे की, कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ङ्गङ्घओमिक्रॉनफफ ही नवीन विषाणु प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये /रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने दिनांक ३१ डिसेंबर, २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत खालील निर्बध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकार्यांनी जारी केलेली ही नियमावली खालीलप्रमाणे आहे.
* लग्न समारंभ : बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळया जागेत साजरा होणारे लग्न समारंभ हे केवळ ५० लोकांच्या मर्यादेत साजरा करता येतील
* कार्यक्रम / मेळावे:- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठया प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम हे केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळया जागेत साजरा करता येतील
अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल.
* वरील प्रमाणे जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तीकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.
तसेच शासन आदेश दिनांक २७ नोव्हेंबर, २०२१ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करण्यार्या व्यक्ती / संस्था / घटक यांच्यावर पोलीस विभाग व संबधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करावी व सदरची रक्कम शासनाच्या दिनांक २६ ऑक्टोंबर, २०२१ रोजीच्या आदेशात नमूद केल्यानुसार लेखाशिर्षाखाली शासन जमा करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
या आदेशांचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.