राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

जळगाव प्रतिनिधी । कोकणासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांसाठी जिल्हा युवक राष्ट्रवादीने मदतीचा हात पुढे केला असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामग्री लवकरच पाठविण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. गटनेते रवींद्र नाना पाटील यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या संदर्भात, त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली काही दिवस झालेत महाराष्ट्रामध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली तसेच कोकणात रायगड, चिपळूण, महाड तालुक्यात झालेल्या सलगच्या अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर येऊन शहरांमध्ये, गावांमध्ये पुराचे पाणी घुसून वित्तहानी,प्राणहानी झालेली आहे. नद्या तुडुंब भरून कोल्हापूर, सांगली या शहरांमध्ये पाणी भरलेले आहेत. तीच परिस्थिती किंवा त्याहूनही भीषण परिस्थिती कोकणात चिपळूण, महाड या शहरांमध्ये आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावची गावे उध्वस्त झालेली आहेत. राहण्यापासून ते खाण्यापिण्याची सर्व साधने पाण्यात गेलेली आहेत. अशी परिस्थितीत स्थानिक नागरिक केवळ जीव वाचवून स्थलांतर करीत आहेत. याचदरम्यान रायगड मधील तळीये या गावात दरड कोसळून संपूर्ण गावच उद्ध्वस्त झालेलं आहे.

या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या परिस्थितीत कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र या भागांवर पूरपरिस्थितीमुळे उपासमारीची, महामारीची वेळ आलेली असतांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून पूरग्रस्त नागरिकांसाठी किराणा, कपडे, धान्य तसेच औषधोपचाराचे साहित्य पाठवले जात आहेत. याच पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेही अशा स्वरूपात मदत संकलित करून लवकरच पाठवली जात आहे. म्हणून माझं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष तसेच पदाधिकार्‍यांना व जिल्हावासीयांना आवाहन आहे की, ज्या दात्यांना साहित्य स्वरूपात मदत द्यायची असेल त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधून मदत द्यावी. लवकरच आमची टीम पूरग्रस्त भागासाठी जीवनावश्यक टीम तसेच वैद्यकीय टीम रवाना होत आहे.

अडचणीत असलेल्या आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी मोठ्या संख्येने समोर यावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील,जिल्हाकार्याध्यक्ष दीपक पाटील,जिल्हा समन्वयक आबासाहेब पाटील, सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.

Protected Content