पेन ड्राईव्ह बॉंब : आ. मंगेश चव्हाण यांची प्रवीण चव्हाणांच्या विरोधात फिर्याद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण राज्याला हादरा देणार्‍या पेन ड्राईव्ह प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्हच्या माध्यमातून माजी मंत्री आ. गिरीश महाजन आणि इतरांना मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे कारस्थान रचत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांच्या पुष्टर्थ्य त्यांनी काही व्हिडीओ क्लीप्स प्रसारमाध्यमांना दिल्या होत्या. तर या स्टींगमधील सुमारे सव्वाशे तासांचे व्हिडीओ रेकॉर्डींग त्यांनी प्रभारी विधानसभाध्यक्षांकडे सुपूर्द केले होते.

या पेन ड्राईव्हच्या एका क्लीपमध्ये चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा सुध्दा संदर्भ आलेला होता. यात सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे मंगेश चव्हाण यांची फाईल तयार करण्याबाबत बोलत असल्याचे दिसून येत होते. यात मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना गोत्यात आणावे असे कारस्थान दिसून आले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्हचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी लागलीच आपण या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही करू असा इशारा दिला होता. या अनुषंगाने त्यांनी आज जिल्हापेठ पोलीस स्थानकात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. यात त्यांनी सरकारी वकील चव्हाण यांनी आपल्याला अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र रचल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या संदर्भात जिल्हापेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक रामदास वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

Protected Content