पवार ‘पॉवर’ कायम : जिल्हा बँक पाठोपाठ दुध संघातही ‘जलवा’

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धरणगावातून संजय पवार यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.

जिल्हा दुध संघाच्या यंदाच्या निवडणुकीत धरणगावातील उमेदवारवरून मोठे वाद-प्रतिवाद झाले होते. जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलकडून तयारी केली असतांना त्यांचे तिकिट कापण्याची तयारी सुरू झाली होती. यामुळे त्यांनी थेट विरोधकांशी हातमिळविणी केली. यातून एकनाथ खडसे आणि संजय पवार यांच्या चांगलीच जुंपली होती. पवार यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद झाल्याची टीका खडसे यांनी केली होती. तर खडसेंना हा अधिकार कुणी दिला ? असा प्रश्‍न विचारत सहकारात राजकारण नसते असे संजय पवार म्हणाले होते.

यानंतर संजय पवार यांनी फैजपूर आणि मुक्ताईनगरच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. दरम्यान, धरणगावातून त्यांची लढत ही गुलाबराव देवकर यांचे खंदे समर्थक वाल्मीक पाटील यांच्या विरोधात होती. येथे जोरदार मुकाबला होईल असे मानले जात होते. तथापि, यात संजय पवार यांनी बाजी मारून आपली सहकारातील ताकद कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

संजय पवार हे गेल्या २२ वर्षांपासून जिल्हा बँकेत संचालक आहेत. आता त्यांची दुध संघात देखील एंट्री झाली आहे.

Protected Content