जळगाव प्रतिनिधी | ज्या लोकांनी जेलमध्ये माझ्या पतीचा खून केला, त्यांच्याकडून मला धमकी येत असल्याने माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप आज मयत रवींद्र उर्फ चीन्या जगताप यांची पत्नी श्रीमती मीनाबाई जगताप यांनी केला आहे. तर त्यांच्या लढ्याला रिपाइं आठवले गटाने पाठींबा दिला आहे.
जळगाव जेलमध्ये झालेल्या मारहाणीत मृत पावलेला रवींद्र उर्फ चीन्या जगताप यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दणका दिल्यानंतर जेलरसह अन्य कर्मचार्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कालच या प्रकरणातील साक्षीदाराने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. तर आज मयत चिन्याची पत्नी श्रीमती मीनाबाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन कारागृह प्रशासनाह पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
या पत्रकार परिषदेत मीनाबाई जगताप म्हणाल्या की, जळगाव जिल्हा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या मारहाणीत माझे पती चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांचा ११ सप्टेंबर २०२० रोजी मृत्यू झाला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने संबंधित ५ आरोपीवर दीड महिन्यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झालेला असला तरी आरोपी अधिकारी आणि कर्मचारी फरार आहेत . हे आरोपी आता फिर्यादी , साक्षीदारांवर दबाव टाकून धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणी जिल्हा पोलीस तटस्थ का ?, असा सवाल देखील त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
मीनाबाई जगताप पुढे म्हणाल्या की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन कारागृह अधीक्षक पेटर्स गायकवाड; तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी; कारागृह रक्षक अण्णा काकड; अरविंद पाटील आणि दत्त खोत यांच्यावर दीड महिन्यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. खरं तर आधीच पोलीस काहीच दखल घेत नसल्याने मला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती. त्यानंतर तब्बल १४ महिन्यांनी हा खुनाचा गुन्हा नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यापासून हे पाचही आरोपी फरार आहेत, सर्व आरोपी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. ते कामावर हजर नाहीत. तथापि कारागृह प्रशासनाकडूनपण त्यांच्यावर निलंबन किंवा बडतर्फीची कुठलीही कारवाई झालेली नाही. जळगाव जिल्हा पोलीस दलाला ते अजून सापडलेले नाहीत…. एवढा प्रदीर्घ काळ त्यांचे फरार असणे आता जिल्हा पोलीस दलावरही भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे. त्यांना नेमके कोण पाठीशी घालत आहे ? हे सत्य समोर यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मीनाबाई जगताप पुढे म्हणाल्या की पाचही आरोपी जळगाव परिसरातील काही लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांचे स्थानिक प्रशासनात परिचय , संबंध असू शकतात. या पार्शवभूमीवर चिन्या जगताप हत्याकांडातील साक्षीदार व सध्या नाशिकच्या किशोर सुधारालयात कारागृह शिपाई या पदावर कार्यरत असलेले मनोज जाधव यांनी जबाब नोंदविण्यास जळगावात येण्यास नकार दिल्याने किशोर सुधारालयाच्या प्राचार्यांनी तशी माहिती देणारे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पाठवले आहे. या हत्याकांडातील आरोपी असलेले अधिकारी आणि कर्मचारी दीड महिन्यांपासून फरार आहेत आपल्या जीविताला येथे आल्यावर धोका होऊ शकतो अशी भीती साक्षीदार मनोज जाधव यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे. साक्षीदाराला भीती वाटावी असा कोणता मुद्दा आहे की जो आतापर्यंत जिल्हा पोलिसांना उलगडता आलेला नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, काही पोलीस कर्मचार्यांमार्फत मला पण धमकावण्याचा प्रयत्न हे आरोपी करत आहेत असा आरोप देखील मीनाबाई जगताप यांनी केला. आरोपींना अटक करण्याचे सोडून या पोलीस कर्मचार्यांना मला आणि साक्षीदाराला भीती वाटावी अशी भूमिका घेण्याचे आदेश कुणी दिले ? आम्ही आता न्याय मिळण्याची आशाच सोडून द्यायची का ? आरोपी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी असूनपण पोलीस आणि कारागृह खाते त्यांच्यावर काहीच कारवाई करणार नाही का ?. साध्या चोरीच्या किंवा हाणामारीच्या गुन्ह्यात समाजातील सामान्य घटक असलेल्या आरोपींना तत्परतेने शोधून अटक करणारे पोलीस खाते या आरोपींच्यासमोर लाचार झालेले आहे का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केल्या. आपण सध्या एकट्या राहत असून आपल्या जीवाला या आरोपींपासून धोका असल्याचे मीनाबाई जगताप यांनी या पत्रकार परिषदे सांगितले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत रिपाइं आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल हे आपल्या सहकार्यांसह उपस्थित होते. मीनाबाई जगताप यांच्या जीवाला धोका असून खुन्यांना तातडीने अटक करण्यात यावे, अन्यथा रिपाइंतर्फे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तर मीनाबाई जगताप यांच्या पाठीशी रिपब्लीकन पक्ष खंबीरपणे उभा असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
खालील व्हिडीओत पहा मीनाबाई जगताप आणि अनिल अडकमोल नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1170305760461366