हाजी गफ्फार मलिक यांचे निधन

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे आज रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

हाजी गफ्फार मलिक यांनी तत्कालीन जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवकपदासह विविध समितींचे अध्यक्षस्थान भूषविले. तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मलिक यांनी दादांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तरी स्वत: पक्ष सोडला नाही. यानंतर त्यांना पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जाणारे गफ्फार मलिक यांनी २०१४ साली यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणून लढविली. मात्र ते पराभूत झाले होते. गप्फारभाईंनी २००९ ते २०१४ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही समर्थपणे भूषविले होते. या कालावधीत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे पाळमुळे मजबूत झाली होती. हाजी गफ्फार मलिक हे करीम सालार यांचे जवळचे मित्र व सहकारी होते. तालिम-ए-अंजुमन मुसलमीन या शैक्षणिक संस्थेचे प्रदीर्घ काळ अध्यक्षपद भूषविणार्‍या गफ्फार मलिक यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिवपदही त्यांनी समर्थपणे भूषविले होते. या शिक्षण संस्थेचा आता वटवृक्ष झाला असून याच्या वाटचालीत त्यांनी घेतलेले अविश्रांत परिश्रम कारणीभूत होते.

मुस्लीम समाजाचे राज्य पातळीवरील नेते म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य महत्वाच्या नेत्यांशी त्यांचे आत्मीयतेचे संबंध होते. मध्यंतरी विधानपरिषदेसाठी देखील त्यांचे नाव चर्चेत होते. यातच आज त्यांचे अकस्मात निधन झाले.

अल्पशा आजाराने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतांना मलिक यांनी शेवटचा श्‍वास घेतला. रात्री साधारणत: साडेदहाच्या सुमारास हाजी साहेबांच्या निधनाची वार्ता येताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Protected Content