अविरत सेवाव्रती : डॉ. अर्जुनदादा भंगाळे !

तब्बल चार दशकांपेक्षा जास्त कालखंडात जळगाव शहरामध्ये वैद्यकीय व सामाजिक सेवेत मापदंड प्रस्थापित करणारे डॉ. अर्जुनदादा भंगाळे यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ज्येष्ठ पत्रकार तथा ज्येष्ठ संपादक सुरेश उज्जैनवाल यांचा हा विशेष लेख !

जळगावचे प्रथितयश शल्य चिकित्सक डॉ. अर्जुन गणपत भंगाळे( डॉ. ए. जी.भंगाळे) आपल्या वयाची ७१ वर्षे पूर्ण करून आज ७२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. तब्बल चार दशकां पेक्षा जास्त काळा पासून ते वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी परिश्रम व सचोटीसह सज्जनता, चारित्र्य जपत आपलं नाव लौकिक कायम ठेवल आहे. त्यांच्या वाढ दिवसा निमित्त त्याचं अभिष्टचिंतन आणि भावी जीवनासाठी मन:पुर्वक शुभेच्छा…

प्रथितयश सर्जन

डॉ. अर्जुनदादा भंगाळे हे तसे फारच लो प्रोफाइल व्यक्तिमत्व…प्रसिद्धी किंवा दिखाऊपणा या बाबी त्यांच्यात कधीही दिसल्या नाही, खर तर एक निष्णात शल्यचिकित्सक म्हणून ते ओळखले जातात. जळगाव जिल्ह्यातील लेवा पाटीदार समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांमध्ये त्यांची गणना होते. दादांचा जीवन प्रवास बघितला तर ते अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील असून जिद्द व चिकटीमुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील मास्टर ऑफ सर्जन म्हणजेच एम.एस. ही उच्च पदवी सम्पादन केली. मुबई मधील प्रसिद्ध नायर हॉस्पिटलमध्ये दोन वर्षें सेवा दिल्यानंतर त्यांनी १९७९ मध्ये स्वत:चे भंगाळे हॉस्पिटल जळगाव शहरात सुरू केल;. ते आजही कार्यरत आहे. गेल्या चाळीस वर्षात त्यांनी रुग्णांची सेवा केली, आव्हानात्मक शस्त्रक्रिया ही यशस्वीरीत्या केल्या. जळगाव शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात नाव लौकिक प्राप्त केला. तर आयएमए या संघटनेचे पाच वर्षपेक्षा जास्त काळ ते अध्यक्ष देखील होते.

अयशस्वी राजकारणी

अर्जुनदादांनी वैद्यकीय क्षेत्रात असंख्य माणसे जोडली. समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांना आपलेसे केले. दिनदुबळ्यांची सेवा केली. कधी बिलासाठी त्यांनी कुणाला अडून पाहिल्याचे एकही उदाहरण नाही. अशी स्थिती असताना ते राजकारणात कोणत्या उद्देश्याने गेले होते, हे काही अद्याप ही उलगडलेलं नाही. कारण राजकीय खेळात जे गुण लागतात ते त्यांच्यात कधी दिसले नाही. असे असताना त्यांनी १९९५ आणि १९९९ मध्ये जळगाव विधानसभेच्या दोन निवडणुका सुरेशदादा जैन यांच्या विरोधात लढविल्या. त्यात ते पराभूत झाले. गंमत म्हणजे सुरेशदादा जैन यांनीच त्यांना राजकारणात आणले होते. श्री जैन यांच्यामुळेच ते १९९२ मध्ये जळगावचे उपनगराध्यक्ष झाले होते. काही तात्विक मतभेदांमुळे ते जैन विरोधी गटात गेले, ते कायमचेच. या दरम्यान त्यांनी २००७ मधील लोकसभेची पोट निवडणूक लढविली मात्र अपयशी ठरले. तात्पर्य ते कधीही निवडणूक जिंकू शकले नाही. अपयशाचे धनी होण्यापेक्षा त्यांनी निवडणूक लढण्याचा नाद ही सोडला. मात्र काँग्रेस विचारांशी ते कायम एकनिष्ठ राहिले आहेत.

भंगाळे कुटुंबाचे बागबान…

डॉ. अर्जुनदादा भंगाळे हे त्यांच्या कुटुंबासाठी बागवान आहेत. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या खेड्यातून ४२ वर्षांपूर्वी जळगावात आले व येथेच त्यांचे संपूर्ण कुटुंब बर्‍या पैकी स्थिरवलेच नाही तर येथे आपला सामाजिक प्रभाव ही निर्माण केला. डॉ. अर्जुनदादांचे वडील बंधू रामदास, लहान बंधू भागवत व शिवाजी तर पुतणे सुनील, विष्णू, डॉ. प्रकाश, श्याम यांनी आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे. उदयोग, व्यापार क्षेत्रासह स्थानिक राजकारणात आपापल्या गुण कौशल्याने आपले स्थान निर्माण केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे जळगावचे आमदार राजूमामा भोळे हे देखील डॉ. भंगाळे यांच्या कुटुंबाचेच घटक आहेत.

अशा या अखंड सेवाव्रती महनीय व्यक्तीमत्वाला उदंड दिर्घायू लाभो, त्यांच्या हातून समाजाची अशीच अविरत सेवा घडो हीच मन:पूर्वक शुभेच्छा…!!

: सुरेश उज्जैनवाल, जळगाव

Protected Content