शेळगाव – बामणोद व कडगाव-जोगलखेडा पुल ठरणार विकासाचे मॉडेल : पालकमंत्री

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपण पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाचे व्हीजन डोळ्यासमोर ठेवले आहे. यानुसार शेळगाव ते बामणोद आणि कडगाव ते जोगलखेडा या दोन्ही पुलांचे भूमिपुजन होत असून हे दोन्ही पुल विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाणार आहेत. या पुलांमुळे आरपट्टी आणि पारपट्टीचे खर्‍या अर्थाने मनोमीलन होणार असून यावलहून जळगावकडे येणार्‍यांचा सुमारे २० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. यामुळे परिसरातील विकासाला प्रगतीचे पंख लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ४४ कोटी रूपयांच्या शेळगाव ते बामणोद या पुलाचे शेळगाव येथे तर २१ कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या कडगाव ते जोगलखेडा या पुलाचे कडगाव येथे भूमिपुजन झाल्यानंतर बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, हे दोन्ही पुल एक वर्षात पूर्ण होणार असून याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधीत खात्याला निर्देश देण्यात आले आहेत. तर, या कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांनी पालकमंत्र्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

शेळगाव ते बामणोद या तापी नदीवरील तर कडगाव ते जोगलखेडा या दरम्यान वाघूर नदीवरील पुलांचे भूमिपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीष चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प. सदस्य पवन सोनवणे, जि.प. सदस्या सौ. पल्लवी जितेंद्र देशमुख, पंचायत समिती सभापती यांचे पती जनाआप्पा कोळी, तापी पाटबंधाऱ्याचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता संतोष भोसले, उपविभागीय अभियंता मधुकर सोनवणे, तांत्रीक सल्लागार प्रकाश पाटील, आरीफ सय्यद, मे. अनंता प्रोकोन प्रा. लि., गुजरात चे कंत्राटदार महेश पटेल, सहाय्यक अभियंता उमेश बोदडे, कनिष्ठ अभियंता कु. ममता सपकाळे, गौरव चव्हाण, चेतन तडवी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, आसोदा येथील सरपंच दिलीप पाटील (कोळी); तुषार महाजन, कडगावच्या सरपंच सौ. भारतीताई कोळी, शेळगावचे सरपंच हरीभाऊ कोळी, शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र सपकाळे, भादलीचे सरपंच मिलींद चौधरी, दूग्ध विकास संस्थेचे विकास पाटील, कडू पाटील आदींसह परिसरातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो सदस्य, यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

प्रारंभी पालकमंत्र्यांसह मान्यवरांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता संतोष भोसले , बी.पी. सांगळे कन्स्ट्रक्शन्स चे प्रकल्प अभियंता सचिन मोरे, अनंता प्रोकॉन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प अभियंता महेश पटेल तसेच शेळगाव बंधार्‍याचे तांत्रीक सल्लागार प्रकाश पाटील यांनी पालकमंत्र्यांसह सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता यशवंतराव भदाणे यांनी केले. त्यांनी कडगाव ते जोगलखेडा आणि शेळगाव ते टाकरखेडा या दोन्ही पुलांबाबतची सविस्तर माहिती दिली.

असे असणार पूल

यातील शेळगाव ते टाकरखेडा (बामणोद) या दरम्यान, तापी नदीवर उभारण्यात येणार्‍या पुलासाठी तब्बल ४४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा पूल ४२० मीटर लांबीचा असून याची रूंदी १२ मीटर इतकी असेल. याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दीड किलोमीटर असा तीन किलोमीटरचा पोच रस्ता प्रदान करण्यात आला आहे. तसेच, वाघूर नदीवरील कडगाव आणि जोगलखेडा या दोन गावांना जोडणार्‍या पुलासाठी २१ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून हा पुल ३९० मीटर लांब आणि सव्वा नऊ मीटर रूंद इतका आहे. यात देखील दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दीड किलोमीटर असा तीन किलोमीटरचा पोच रस्ता प्रदान करण्यात आला असल्याची माहिती अधिक्षक अभियंता यशवंतराव भदाणे यांनी दिली. हा पूल अतिशय अद्ययावत अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

तडफदार, दिलदार व उदार व्यक्तीमत्व म्हणजेच गुलाबभाऊ : आ. शिरीष चौधरी

यावल-रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्र्यांचे अगदी तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले की, शेळगाव – बामणोद ते टाकरखेडा या पुलामुळे आमच्या मतदारसंघाची जळगाव सोबतची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. या कामाला निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागत असून या माध्यमातून *”राजा उदार झाला.. . .आणि रांजण पाण्याने भरला”* असे म्हणावे लागेल. भाऊ हे तडफदार, दिलदार आणि उदार असून अशा पालकमंत्र्यांचा आपल्याला अभिमान वाटतो असे कौतुकोदगार आ. शिरीष चौधरी यांनी काढले.

*पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून अनेक मुद्यांना हात घातला. ते म्हणाले की, शेळगाव ते टाकरखेडा आणि कडगाव ते जोगलखेडा या दोन्ही पुलांमुळे मने जोडली जाणार आहेत. या परिसरातील शेतकरी हे अतिशय मेहनती असून आता शेळगाव बंधारा पूर्णत्वाकडे आल्यामुळे या भागात सुबत्ता येणार असून याचा इतर भागांशी संबंध देखील सुकर होणार आहे. आपण जळगाव ग्रामीणचे आमदार असलो तरी पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यात विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असतो. शेतकरी हा आमच्या वाटचालीचा केंद्रबिंदू असून जिल्ह्यात मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेतून ५०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.*

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक चंदन कोळी यांनी केले. तर आभार तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संतोष भोसले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी महामंडळाचे अधीक्षक अभियंता, यशवंत महाजन, कार्यकारी अभियंता संतोष भोसले, यशवंत भदाणे, उपविभागीय अभियंता मधुकर सोनवणे, आरीफ सय्यद, मे. अनंता प्रोकोन प्रा. लि., गुजरात चे कंत्राटदार महेश पटेल, सहाय्यक अभियंता उमेश बोदडे, कनिष्ठ अभियंता कु. ममता सपकाळे, गौरव चव्हाण, चेतन तडवी यांनी सहकार्य केले

Protected Content