जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळा प्रकरणात प्रभावीपणे बाजू मांडणारे अॅड.प्रवीण चव्हाण यांना वगळून मुख्य विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.अमोल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावर अण्णा हजारे यांची अॅड.सावंत यांच्या नियुक्तीवर हरकत घेतली होती याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली होती. दरम्यान, अॅड. सावंत यांनी राजीनामा दिल्याने घरकुल घोटाळ्याचे पुढील कामकाज अॅड.प्रवीण चव्हाण यांच्याकडे राहणार असल्याचे बोलले जात आहे.
घरकुल खटल्यात धुळे न्यायालयाने माजी मंत्री सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, राजा मयुर, मेजर नाना वाणी, प्रा.आ.चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह 48 जणांना 29 ऑगस्ट रोजी शिक्षा आणि दंड सुनावली. त्यानंतर दोषी ठरलेले आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. याप्रकरणी सरकारतर्फे कामकाज पाहत असलेले अॅड.प्रवीण चव्हाण हे काम पाहत असतांना त्यांना वगळून अचानकपणे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अमोल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र ॲड. सावंत यांची नियुक्ती संशयास्पद असल्याची तक्रार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती व केलेली नियुक्त त्वरीत रद्द करावी अशी देखील मागणी केली होती. त्यानंतर विशेष सरकारी वकील ॲड. सावंत यांनी राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा शासनाने मंजूर केला आहे. घरकुल खटल्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ देता येत नसल्याची प्रतिक्रीया ॲड. सावंत यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.