सातपुड्याच्या पायथ्याशी रंगणार बहुरंगी सामना !

raver photo

रावेर शालीक महाजन । सातपुड्याच्या पायथ्याशी असणार्‍या रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता असून प्रथमदर्शनी येथे बहुरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रावेर-यावल हा क्षेत्रफळाने पूर्व-पश्‍चिममध्ये विभागलेला मतदारसंघ आहे. आधी या दोन्ही तालुक्यांचे स्वतंत्र मतदारसंघ होते. यात रावेर मतदारसंघ हा दिवंगत बाळासाहेब चौधरी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. तर यावलमध्ये आधी जे. टी. महाजन आणि नंतर तीन वेळेस रमेश विठ्ठल चौधरी यांनी विजय मिळवला होता. येथून १९९९ साली हरीभाऊ जावळे यांनी चौधरी यांना पराभूत केले होते. तर रावेरमधून ९५ आणि २००४ साली अरूण पांडुरंग पाटील तर ९९ साली राजाराम गणू महाजन यांनी विजय संपादन केला होता. दरम्यान, २००९ साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दोन्ही तालुक्यातील मुख्य भागाला एकत्र करून नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. या पुर्नरचनेत रावेर-यावल मतदारसंघाची निर्मिती झाली. यावेळी भाजपने तत्कालीन आमदार अरुण पाटील यांच्याऐवजी शोभा चौधरी यांना उमेदवारी दिली. कॉग्रेसकडून रमेश विठ्ठल चौधरी तर शिरीष चौधरी अपक्ष लढले. यात शिरीष चौधरी यांनी विजय संपादन केला. तथापि, २००४ साली शिरीष चौधरी यांचा पराभव करून हरीभाऊ जावळे यांनी विधानसभेत पुन्हा प्रवेश केला.

आता आचारसंहिता लागल्यानंतर रावेर-यावल मतदारसंघातील लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे यांना पक्षाने कृषी संशोधन आणि विकास संस्थेच्या उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून कॅबीनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. एका अर्थाने त्यांची पदोन्नती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी भाजपतर्फे तयारी सुरू केली आहे. तर कांग्रेसतर्फे माजी आमदार शिरीष चौधरी यांचाही प्रचार सुरू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ते काँग्रेसकडून लढणार की अपक्ष ? याबाबत संभ्रम आहे. तथापि, त्यांची तयारी सुरू झाली हे निश्‍चीत. तर दुसरीकडे भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीदेखील अपक्ष म्हणून तयारी केली आहे. दरम्यान, विवेक ठाकरे यांनी एमआयएम तर ट्रान्सजेंडर कार्यकर्ते शमिभा यांनी वंचित बहुजन आघाडीकडे तिकिटाचे मागणी केली आहे. या बाबींचा विचार करता, येथे बहुरंगी लढत होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

जातीय समीकरणांचा विचार केला असता येथे लेवा पाटीदार समाज बहुसंख्य असून याच्या जोडीला मुस्लीम, मराठा आणि बौध्द समाजाची मतेदेखील निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसकडून शिरीष चौधरी हे इच्छुक असले तरी रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनीदेखील पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. भाजपकडून हरीभाऊ जावळे यांचा दावा मजबूत असून उद्योजक श्रीराम पाटील, डॉ. कुंदन फेगडे, सुरेश धनके, पद्माकर महाजन यांनीदेखील पक्षाकडे मुलाखती दिल्या आहेत. तर एमआयएम, मनसे, वंचित आघाडी यांच्यातर्फे काही नावे आश्‍चर्यकारक पध्दतीत समोर येण्याची शक्यता आहे.

Protected Content