नाथाभाऊंच्या मालमत्ता अशा प्रकारे जाणार ईडीच्या ताब्यात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यासह एकूण पाच जणांच्या आधीच टाच आणलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस दिल्याने खळबळ उडाली आहे. ईडीने नेमकी काय नोटीस दिली आणि याची अंमलबजावणी नेमकी कशी होणार ? याबाबती इत्यंभूत माहिती देणारा हा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

एकनाथराव खडसे हे महसूल तसेच अन्य खात्यांचे मंत्री असतांना भोसरी औद्योगीक वसाहतीतील एक भूखंड त्यांची पत्नी आणि जावई यांनी विकत घेतल्याचे प्रकरण त्यांना खूप भोवले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत पक्षांतर केल्यानंतर याच प्रकरणी ईडीने त्यांना नोटीसा बजावल्या. याबाबतचे वार्तांकन आणि लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून वाचले असेलच. या प्रकरणी खुद्द खडसे यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवतींंची ईडीने चौकशी केली आहे. तर याच प्रकरणी दाखल खटल्यास खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे ५ जुलै २०२१ पासून कारागृहात आहेत. यानंतर २५ ऑगस्ट २०२१ रोजी ईडीने एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या ११ मालमत्तांवर टाच आणली होती. आता याच मालमत्तांच्या प्रकरणी ईडीने एकनाथराव खडसे यांनी नोटीस बजावली असून याबाबतचे इत्यंभूत वृत्त फ्रि प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

या वृत्तानुसार एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने ३० मे रोजी नोटीस बजावली आहे. या नोटीसीनुसार एकनाथराव खडसे आणि इतर चार जणांची मालकी असणार्‍या १० मालमत्ता या ईडीकडे दहा दिवसांच्या आत हस्तांतरीत करायचे आदेश देण्यात आले आहेत. यात बंगला, प्लॉट, फ्लॅट आदींचा समावेश आहे. या मालमत्ता जळगाव, लोणावळा, पुणे, नाशिक, मुंबई आणि सुरत येथील असून त्या एकनाथराव खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश दयाराम चौधरी, इन्सीया मुर्तझा बादलवाला आणि एम.एफ उकानी यांच्या मालकीच्या आहेत. भोसरी भूखंड खरेदी प्रकरणातील हे सर्व जण असल्याची बाब लक्षणीय आहे. या नोटीशीनुसार दहा दिवसांच्या आत म्हणजे ९ जूनपर्यंत या मालमत्ता ईडीकडे हस्तांतरीत करायच्या आहेत. ईडीने या नोटीसच्या माध्यमातून त्यांना संबंधीत मालमत्ता ‘खाली’ करण्याचे स्पष्टपणे बजावले आहे. या मालमत्ता २५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंड्रींग ऍक्ट (पीएमएलए) अंतर्गत जप्त केल्या आहेत. आता याच मालमत्तांची मालकी ईडीकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपण वाच आहात लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा स्पेशल रिपोर्ट.

सक्तवसुली संचालनालयाचे उपसंचालक अमित भास्कर यांच्या स्वाक्षरीने सदर आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहेत. या नोटिशीनुसार संबंधीत मालमत्ताधारकांनी दहा दिवसांच्या आत याला ईडीकडे हस्तांतरीत करायचे आहे. या संदर्भात राज्याचे नोंदणी महानिरिक्षक तसेच जळगाव, पुणे, नाशिक, मुंबई आणि सुरत येथील जिल्हाधिकार्‍यांनाही माहिती देण्यात आली आहे. या मालमत्ता इतर कुणाच्या नावावर नोंदणी करून विक्री, हस्तांतर करण्यासह लीेरव देण्यात येऊ नयेत असे या निर्देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे. फ्रि प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार पीएमएलए कायदा-२००२ च्या कलम-८ मधील अनुच्छेद-४ नुसार ही मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्यासह इतर चौघांच्या दहा मालमत्ता ईडी ताब्यात घेणार असल्याचे या नोटीसीवरून स्पष्ट झाले आहे. तथापि, मालमत्तांचे मालक असणारे खडसे आणि अन्य मान्यवर याला कोर्टात आव्हान देतील की नाही ? ते याबाबत कोर्टात स्थगिती वा दाद मागणार का ? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: