
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर, वाहन, शिक्षण आणि व्यवसायासाठी सुलभ अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले ‘रिटेल क्रेडिट आऊटरीच अभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित या विशेष अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘उज्ज्वल भविष्यासाठी’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विविध कर्ज योजनांची माहिती देत ग्राहकांना थेट लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आला.

२२ मे २०२६ रोजी आयोजित या अभियानात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक प्रमुख रमेश जेठानी, जळगाव जिल्ह्याचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सुनीलकुमार दोहरे, सीए हितेश आगीवाल तसेच समाज कल्याण विभागाचे विशाल राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानात गृह कर्ज, वाहन कर्ज, सुवर्ण कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच शेतकरी कर्ज योजनांवर विशेष भर देण्यात आला. गृह कर्जासाठी ७.१० टक्क्यांपासून, वाहन कर्जासाठी ७.५० टक्क्यांपासून, सुवर्ण कर्जासाठी ८.५० टक्क्यांपासून आणि शिक्षण कर्जासाठी ६.७५ टक्क्यांपासून व्याजदर उपलब्ध असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कमी व्याजदर आणि सुलभ प्रक्रिया यामुळे ग्राहकांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळाली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी बँकिंग योजनांचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने कटिबद्ध असून, अशा अभियानांमुळे नागरिकांना थेट मार्गदर्शन आणि तत्काळ सेवा मिळत असल्याचे मत प्रादेशिक प्रमुख रमेश जेठानी यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा बँकिंग क्षेत्राशी समन्वय साधून गरजू घटकांना आर्थिक मुख्य प्रवाहात आणण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या अभियानात परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरादरम्यान काही लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि सुवर्ण कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले. या शिबिरात एकूण १५ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सुनीलकुमार दोहरे यांनी दिली.
यावेळी पुढील विशेष शिबिर केवळ शेतकऱ्यांसाठी ६ जून रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली. कृषी क्षेत्रातील नागरिकांना सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.



